

बंगळूर : 2028 पर्यंत राज्यात मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी राहणार नाही. फक्त हायकमांडच मुख्यमंत्री बदलू शकते. हायकमांडने कुणालाही मुख्यमंत्री केले तरी आम्ही त्यांना सहकार्य देऊ, असे मंत्री जमीर अहमद यांनी स्पष्ट केले. ते बंगळूर येथे शनिवारी (दि. 17) पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, आम्ही या विषयावर आमचे मत व्यक्त केले आहे. शेवटी हायकमांड निर्णय घेईल. डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले तरी त्यांचे स्वागत आहे. भाजपने नोव्हेंबर क्रांती होईल, असे म्हटले होते. आता संक्रांतीचा सण संपला आहे. ते गुढी पाडव्याची वाट पाहत आहेत. पण, काहीही होणार नाही, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी आमच्या सरकारने कोणत्या जिल्ह्यात किती घरे बांधली आहेत ते जाऊन तपासावे. आमच्यावर हमी योजना राबविण्यासाठी दबाव आहे. भाजप सरकार सत्तेत होते तेव्हा कोणत्याही हमी योजना राबविल्या गेल्या नव्हत्या. तरीही ते घरे का बांधू शकले नाहीत? बळ्ळारीत एक छोटा बॅनर उभारण्यावरुन गोंधळ झाला. जनार्दन रेड्डी यांनी बॅनर उभारण्याची परवानगी दिली असती तर गोंधळ झाला नसता. बळ्ळारीत वाल्मिकीचा पुतळा उभारण्याची मागणी बऱ्याच काळापासून होती. भाजप ते करु शकला नाही. आमदार भरत रेड्डी यांनी पुतळा उभारला, असा टोलाही मंत्री खान यांनी मारला.