

IMD red alert Karnataka
बंगळूरु: कर्नाटकात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात १७ जूनपर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर दक्षिण अंतर्गत कर्नाटकात १४ जूनपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, खबरदारीचा उपाय म्हणून धारवाड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, धारवाड जिल्ह्याच्या उपायुक्त दिव्या प्रभू यांनी गुरुवारी (दि.१२) जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, तसेच महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली. हुबळी परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत, विशेषतः हनाशी गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
हवामान विभागाने कर्नाटकसाठी सात दिवसांचा इशारा दिला असून, १७ जूनपर्यंत जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. किनारपट्टी कर्नाटकच्या जिल्ह्यांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, उत्तर कर्नाटकातील काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि अतिवृष्टीची शक्यता आहे. आयएमडीच्या अहवालानुसार, कोप्पळ, हावेरी, बागलकोट, विजयपुरा, कलबुर्गी आणि रायचूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि जोरदार पाऊस होईल. बिदर आणि यादगीर जिल्ह्यांमध्येही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकात, शिवमोगा, चिकमंगळूर आणि कोडागु जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ताशी ५०-६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासोबतच जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे नवलगुंड तालुक्यातील यमनूर गावाजवळ तुपरी तलाव ओसंडून वाहत आहे. यामुळे आपल्या फार्महाऊसमध्ये असलेले चार जणांचे एक कुटुंब अडकून पडले. वाढत्या पाण्यामुळे घराभोवती पाणीच पाणी झाले असून, बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. गडग जिल्ह्यातही पावसाने कहर केला असून, रोण तालुक्यातील यावगल गावाजवळ बेण्णेहळ्ळा नदीला पूर आला आहे. पुलावर पाणी साचल्याने रोण-नारगुंड-यावगल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, हुबळीतील अंबिका नगर उंकळ परिसरात जोरदार पावसामुळे एक मोठे झाड उन्मळून पडले. या घटनेमुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हुबळीच्या अनेक भागांमध्ये पावसामुळे पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.