

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा (SM Krishna passes away) यांचे आज मंगळवारी दीर्घ आजाराने (SM Krishna passes away) निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. दरम्यान, एस. एम. कृष्णा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने (Karnataka government) तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर जाहीर केला आहे. तसेच राज्य शासनाने बुधवारी सुट्टी जाहीर केली आहे. एस. एम. कृष्णा यांच्या सन्मानार्थ प्रमुख सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे. तीन दिवस कोणतेही शासकीय कार्यक्रम अथवा मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत, असे कर्नाटक सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी सांगितले की, कृष्णा यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मद्दूर येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजता पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. बंगळूरमध्ये उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच बुधवारी मद्दूरमध्ये सकाळी १०.३० ते दुपारी ३ दरम्यान त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
कृष्णा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री ते देशाचे परराष्ट्र मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भारतीय राज्यकारणात १० वेगवेगळी पदे भूषविली होती. महाराष्ट्राच्या राज्यपाला पदाचा त्यांनी २००८ रोजी राजीनामा दिला होता. २००९ मधील तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. त्यांनी मार्च २०१७ मध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला होता. २००९ ते २०१२ पर्यंत ते केंद्रीय परराष्ट्र मंत्री होते. त्यांनी २००४ ते २००८ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस. एम. कृष्णा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "एस.एम. कृष्णा हे एक असामान्य नेते होते. इतरांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांनी नेहमीच अथक परिश्रम घेतले. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी भर दिला. एस. एम. कृष्णाजी हे एक विपुल वाचक आणि विचारवंत होते.'' असे पीएम मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.