पुढारी ऑनलाईन डेस्क: कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याला कोठडीत व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती. एक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. तपासानंतर बेंगळुरू कारागृहातील सात अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा म्हणाले की, पोलिसांनी प्राथमिक तपासाच्या आधारे कारवाई केली आहे. त्यात सात अधिकारी सहभागी असल्याचे आढळून आले असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आता या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे, कारण हा सुरक्षेतील गंभीर त्रुटी आहे.
दर्शनाचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद सुरू झाला. रेणुकास्वामी हत्येप्रकरणी अभिनेता दर्शन सध्या बेंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. फोटोमध्ये, अभिनेता आरामात खुर्चीवर बसून, सिगारेट ओढताना आणि कॉफी पिताना दिसत आहे. तर त्याच्यासोबत आणखी तीन लोक हसताना दिसत आहेत.
वृत्तानुसार, दर्शनासोबत दिसलेल्यांमध्ये गुन्हेगार विल्सन गार्डन नागा, अभिनेत्याचा व्यवस्थापक आणि सहआरोपी नागराज आणि आणखी एक कैदी कुल्ला सीना यांचा समावेश आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दर्शन एका व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल करतानाही दिसत आहे.