

Jyoti Malhotra Case
नवी दिल्ली : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्यावरून हरयाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीला पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत अशा 11 जणांना गेल्या काही दिवसांत अटक करण्यात आली आहे. तथापि, ज्या कायद्यान्वये ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली तो ऑफिशियल सीक्रेट्स अॅक्ट (Official Secrets Act) 1923 नेमका काय आहे जाणून घेऊया...
गुप्तचर कारवाया (espionage) रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला होता.
हा कायदा भारतातील सर्व नागरिकांवर, देशांतर्गत तसेच देशाबाहेर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर लागू होतो.
हा कायदा सरकारी गोपनीय माहितीची अनधिकृत देवाण-घेवाण, गोपनीय कागदपत्रांचे अयोग्य हस्तांतरण आणि देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या कृत्यांना या कायद्याद्वार गुन्हा ठरवले जाते.
यामध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित ठिकाणी जाणे, गोपनीय नकाशे, आराखडे, संकेतशब्द, दस्तऐवज, किंवा माहिती गोळा करणे आणि ती परकीय शक्तींना उपयोगी पडेल अशा पद्धतीने वापरणे किंवा इतरत्र प्रसारित करणे गुन्हा मानले जाते.
या कायद्याचे उल्लंघन केल्यास तपासल्या जाणाऱ्या बाबींच्या गंभीरतेनुसार 3 वर्षांपासून ते आजन्म कारावासापर्यंत शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
कलम 3 हे गुप्तचर किंवा देशाच्या सुरक्षेला धोकादायक ठरणाऱ्या कृतींना उद्देशून आहे.
यामध्ये पुढील कृत्ये गुन्हे मानली जातात:
बंदी घातलेल्या संरक्षण स्थळांजवळ जाणे, पाहणी करणे किंवा त्यात प्रवेश करणे.
नकाशे, आराखडे, मॉडेल्स किंवा टिपणं तयार करणे, जी शत्रूंना उपयोगी पडू शकतात.
गोपनीय संकेतशब्द, दस्तऐवज, किंवा माहिती गोळा करणे, रेकॉर्ड करणे, प्रसारित करणे.
शिक्षा: संरक्षण क्षेत्राशी संबंधित गुन्ह्यासाठी 14 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. इतर बाबतीत 3 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
कलम 5 अंतर्गत, ज्यांच्याकडे त्यांच्या सरकारी जबाबदारीमुळे गोपनीय माहिती आहे, त्यांनी ती माहिती अयोग्य व्यक्तींना दिल्यास किंवा तिचा गैरवापर केल्यास ते गुन्हा मानले जाते.
या कलमांतर्गत गुन्हे:
गोपनीय माहिती, दस्तऐवज, संकेतशब्द इत्यादी अनधिकृत व्यक्तींना सांगणे.
अशा माहितीचा परकीय शक्तीच्या फायद्यासाठी किंवा देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या प्रकारे वापर करणे.
माहिती योग्य ती काळजी न घेता हाताळणे, ज्यामुळे तिच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो.
शिक्षा: 3 वर्षांपर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही.
भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita), कलम 152 नुसार, जर व्यक्ती जाणूनबुजून किंवा हेतुपुरस्सर शब्दांद्वारे (लेखीत किंवा मौखिक), चिन्हांद्वारे, दृश्यमान सादरीकरणाद्वारे, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, आर्थिक साधनांचा वापर करून, किंवा इतर कोणत्याही मार्गाने भारताच्या सार्वभौमत्व, एकात्मता आणि एकजुटीला धोका पोहोचवणाऱ्या कृती यांना प्रोत्साहन दिल्यास किंवा असे कृत्य केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होतो.
शिक्षा: जन्मठेप किंवा 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड लागू शकतो.