४१ दिवसांनंतर डॉक्टरांचा संप अखेर मागे, शनिवारपासून आपत्कालीन सेवा सुरू
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप सुरु केला होता. दरम्यान, तब्बल ४१ दिवसांनतर सुरू असलेला संप मागे घेत असल्याची घोषणा ज्युनियर डॉक्टरांनी केली आहे. ते २१ सप्टेंबरपासून हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू करणार आहेत. मात्र, ओपीडी सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारपासून डॉक्टर आपत्कालीन सेवा देण्यास सुरुवात करतील. ते सध्या आउटडोअर आणि इनडोअर सेवांमध्ये सहभागी होणार नाहीत. या आंदोलनाला पाठिंबा देत गुरुवारी (दि.19) राज्यातील वरिष्ठ डॉक्टरांनीही कनिष्ठ डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.
काय आहे घटना?
९ ऑगस्ट रोजी ३१ वर्षीय पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला होता. या प्रकरणी कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर पश्चिम बंगालसह देशभरात डॉक्टरांनी निदर्शने केली. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर दिल्लीसह देशातील इतर भागातील आंदोलनकर्ते डॉक्टर कामावर परतले, मात्र पश्चिम बंगालमधील ज्युनियर डॉक्टरांनी आंदोलन कायम ठेवले.
'न्यायासाठी आमचा लढा संपलेला नाही'
संप संपल्याची घोषणा करताना आंदोलक डॉक्टरांनी सांगितले की, आमचा न्यायासाठीचा लढा अद्याप संपलेला नाही. ते पुढे म्हणाले की, शनिवारपासून पश्चिम बंगालच्या सरकारी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा अंशतः पूर्ववत केल्या जातील. बंगालमधील पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील. आंदोलक डॉक्टरांनी शनिवारपासून 'काम बंद' मोहीम अंशत: मागे घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी आरोग्य भवनाबाहेरील आंदोलन मागे घेतले जाईल. पश्चिम बंगाल सरकारच्या सर्व आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी आठवडाभर वाट पाहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा काम बंद पाडू.
सरकारने डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या केल्या मान्य
पश्चिम बंगाल सरकारने डॉक्टरांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर आंदोलक ज्युनिअर डॉक्टरांनी शनिवारपासून आपले आंदोलन अंशत: संपवून सरकारी रुग्णालयांना सेवा देण्याचे जाहीर केले आहे. महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर डॉक्टरांनी गेल्या ४१ दिवसांपासून कामबंद आंदोलन केले. आंदोलन संपवण्यापूर्वी ते राज्य आरोग्य विभागाच्या मुख्यालय स्वास्थ्य भवन ते सॉल्ट लेक परिसरातील सीजीओ कॉम्प्लेक्स येथील सीबीआय कार्यालयापर्यंत मोर्चा काढतील. एका आंदोलक डॉक्टराने त्यांच्या सर्वसाधारण सभेनंतर सांगितले की, 'पश्चिम बंगालमधील पूरस्थिती लक्षात घेता आणि राज्य सरकारने आमच्या काही मागण्या मान्य केल्याने आम्ही शनिवारपासून आपत्कालीन सेवा सुरु करत असल्याचे म्हटले आहे.