नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणाची चौकशी संयुक्त तांत्रिक समिती करणार आहे. भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली या समितीची घोषणा गुरुवारी (दि.२९) केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने केली. या समितीत महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश असेल. (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse)
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेचा वारसा, आधुनिक भारतीय नौदलाबरोबर त्याचे ऐतिहासिक नाते यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून ४ डिसेंबर २०२३ रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. राज्य सरकारच्या समन्वयाने भारतीय नौदलाने या प्रकल्पाची संकल्पना तयार केली होती आणि त्यासाठी राज्य सरकारने निधीही उपलब्ध करून दिला असल्याचे मंत्रालयाने सांगितले. (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse)
पुतळा लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्यासाठी भारतीय नौदल वचनबद्ध असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.