मालवण समुद्रकिनाऱ्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा वादळी वाऱ्यामुळे काेसळला
Statue of Shivaji Maharaj on Malvan beach collapsed
मालवण समुद्रकिनाऱ्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला File Photo
Published on
Updated on

मालवण : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज झालेल्या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्याच्या झोतात कोसळला. ही घटना आज (सोमवार) सकाळी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

राज्यातील या धक्कादायक घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुतळा कोसळताच या परिसरात शिवप्रेमींनी गर्दी केली. यावेळी भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो अशा घोषणा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. वातावरण तणावपूर्ण होताच मालवण पोलीस प्रशासनाच्यावतीने मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. या प्रसंगी तात्काळ आमदार वैभव नाईक यांनी भेट देत संबंधित विभागाने जे निकृष्ट दर्जाचे काम केले व आमच्या अस्मितेला धक्का दिला त्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करा फौजदारी गुन्हा दाखल करा अशा सूचना पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना केल्या.

आमदार वैभव नाईक यांनी राजकोट येथे भेट देत पाहणी केली. आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब असून, या घटनेचा आपण तीव्र निषेध करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली. शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले. ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षक ठरला होता. गेले दोन तीन दिवस किनारपट्टी भागात वादळी वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच आज दुपारी वादळी वाऱ्यामुळे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळला.

स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी यांची माहिती प्रशासनास दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवप्रेमींनी राजकोट येथे धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हेही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतप्त बनले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली आहे. पुतळ्याच्या ठिकाणी कोणालाही जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news