जिहादी, रोहिंग्या, बांगलादेशी संबोधणे भारतीय मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही : मुंबई पोलिस

नितेश राणे, टी राजा, गीता जैन यांना मुंबई पोलिसांकडून दिलासा
mumbai police mumbai High Court
मुंबई उच्च न्यायालयFile photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिहादी, बांगलादेशी, रोहिंग्या म्हणून संबोधणे हे भारतात राहणाऱ्या मुस्लिम समुदायाच्या विरोधात नाही, अशी माहिती देत भाजप नेते नितेश राणे, टी राजा आणि गीता जैन यांच्याविरोधात कलम 295 अ (धार्मिक भावना दुखावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करू शकत नाही अशी माहिती मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. मंगळवारी (दि.9) या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. राणे, जैन, राजा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुस्लिम समाजाविरोधात द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकणी नितेश राणे, गीता जैन, टी. राजा यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणी होत आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

घाटकोपर, मानखुर्द, मालवणी, काशीमीरा या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात या भाजपच्या नेत्यांनी मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य केले होते. असा आरोप करण्यात आला होता. मात्र, भाजपच्या नेत्यांनी आपल्या भाषणात रोहिंग्या आणि बांगलादेशींच्या विरोधात वक्तव्य केले आहे. जी कोणत्याही भारतीय किंवा इतर समुदायाच्या विरोधात नाहीत. त्यामुळे नितेश राणे आणि अन्य भाजप नेत्यांवर धार्मिक भावना भडकावल्याबद्दल कलम लावता येणार नाही, असे मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. रोहिंग्या, बांगलादेशींविरोधात या नेत्यांनी भाषण केल्याचा दावा मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आला आहे.

सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. मानखुर्द पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये 295 ए कलम लावण्यात आले आहे. तिथे मुस्लिम समाजाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता. तर, घाटकोपर येथील प्रकरणात राणे, सुभाष अहिरविरोधात 153 ए, 153 बी, 504, 506 या कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. मालवणी येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भा.दं.वि.च्या कलम 153 ए, 504, 506, 188 कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. तर, काशिमीरा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये भादंविच्या कलम 143, 149 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याप्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news