

Jharkhand Ranchi-Delhi air ambulance crash News
रांची : रांचीहून दिल्लीकडे निघालेली एअर ॲम्ब्युलन्स झारखंडमधील घनदाट जंगलात कोसळल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या विमान दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे हे विमान होते, असे वृत्त आहे.
पाच प्रवासी आणि दोन कॅबिन क्रू असे सात जण एअर ॲम्ब्युलन्समधून रांचीहून दिल्लीच्या दिशेने निघाले होते. संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले होते. मात्र, खराब हवामानामुळे काही वेळातच विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानाचा शेवटचा संपर्क झाला तेव्हा ते विमान लातेहार- पलामू या भागातून जात होते.
या आधारे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने विमानाचा शोध घ्यायला सुरूवात केली. यादरम्यान, विमान घनदाट जंगलात कोसळल्याचे निदर्शनास आले. पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू असल्याचे चतरा जिल्ह्यातील कसारिया ग्रामपंचायतीच्या हद्दीत विमान कोसळल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तपत्रांनी दिले आहे. एअर ॲम्ब्युलन्सममधील सर्व प्रवासी आणि क्रूच्या प्रकृतीबाबत रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
डीजीसीए म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'विमान अपघात अन्वेषण विभाागाचे (aircraft accident investigation bureau -aaib) पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. संध्याकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी विमानाने उड्डाण केले होते. 7 वाजून 34 मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला होता. बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे', अशी माहिती डीजीसीएने माध्यमांना दिली.
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिनाचा कालावधी होत नाही तोवर ही दुसरी विमान दुर्घटना घडली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांच्यावर आरोप केले होते. देशातील विमान अपघात आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील गोंधळ यावरुन सध्या नागरी उड्डाणमंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.