

रांची: झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रामगड जिल्ह्यातील गोला तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी नेमरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हेमंत सोरेन यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
रांचीतील मोरहाबादी येथील निवासस्थानावरून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांचे मूळ गाव नेमरा येथे आणण्यात आले होते. येथे हजारो लोकांनी भावुक होऊन आणि पाणावलेल्या डोळ्यांनी 'गुरुजीं'ना नमन करत अखेरचा निरोप दिला.
दिवंगत शिबू सोरेन यांना अखेरचा जोहार करण्यासाठी नेमरा गावात जनसागर लोटला होता. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. प्रत्येकाने झारखंड राज्याचे प्रणेते, पथप्रदर्शक आणि मार्गदर्शक असलेल्या दिशोम गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.
दिशोम गुरु शिबू सोरेन यांच्या निधनाची बातमी कळल्यापासूनच त्यांचे मूळ गाव नेमरा शोकमग्न झाले होते आणि सर्वत्र शांतता पसरली होती. प्रत्येकजण दुःखी होता; अनेक घरांमध्ये चूलही पेटली नव्हती. जेव्हा गुरुजींचे पार्थिव त्यांच्या मूळ घरी पोहोचले, तेव्हा संपूर्ण नेमरा गाव शोकसागरात बुडाले. कुटुंबीय आणि नातेवाईकांसह राज्याच्या दूरवरून आलेल्या लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. सर्वांनी दिशोम गुरुजींना नमन करत त्यांना अखेरचा निरोप दिला.