

Jharkhand open jail system
रांची: झारखंड सरकार निवडक कैद्यांना दिवसा कारागृहाबाहेर जाऊन काम करण्याची आणि आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवण्याची परवानगी देणार आहे; मात्र दिवसभर काम केल्यानंतर या कैद्यांना संध्याकाळी पुन्हा कारागृहात परतावे लागेल.
झारखंडमधील चार मध्यवर्ती कारागृहांद्वारे ही 'ओपन' आणि 'सेमी-ओपन' बॅरक व्यवस्था लागू केली जाणार आहे. यामध्ये रांचीचे बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह, हजारीबागचे जयप्रकाश नारायण मध्यवर्ती कारागृह, पूर्व सिंगभूमचे घागीडीह मध्यवर्ती कारागृह आणि दुमका मध्यवर्ती कारागृहाचा समावेश आहे. या चारही कारागृहांमध्ये या व्यवस्थेसाठी बराकी आणि कोठड्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
कारागृह महानिरीक्षक सुदर्शन मंडल यांनी शनिवारी याविषयी माहिती देताना सांगितले की, "या नव्या व्यवस्थेनुसार कैदी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान बाहेर जाऊन स्वतःच्या व कुटुंबाच्या उपजीविकेसाठी काम करू शकतील आणि १२ तासांनंतर कारागृहात परततील. ही चारही कारागृहे शहरांच्या ठिकाणी असल्याने कैद्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील."
राज्य मंत्रिमंडळाने एका अधिसूचनेद्वारे या उपक्रमाला नुकतीच मंजुरी दिली आहे. 'झारखंड जेल आणि सुधार सेवा कायदा, २०२५' अंतर्गत अशा खुल्या सुधारगृहांची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 'सुहास चकमा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया' या खटल्यातील निर्देशांनुसार घेण्यात आला आहे. ज्या राज्यांमध्ये स्वतंत्र खुली सुधारगृहे नाहीत, तेथे सध्याच्या कारागृहांमध्येच 'ओपन' किंवा 'सेमी-ओपन' बराकी तयार करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.
कोणत्या कैद्यांना या योजनेचा लाभ मिळेल, हे ठरवण्यासाठी लवकरच एक कार्यपद्धती तयार केली जाईल. कैद्यांचे कारागृहातील चांगले वर्तन आणि नियमांचे तंतोतंत पालन हे या योजनेसाठी पात्र ठरण्याचे मुख्य निकष असतील, असेही मंडल यांनी सांगितले.