पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना घेऊन दिल्लीला परतणाऱ्या विमानात झारखंडमधील (Jharkhand) देवघर विमानतळावर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे त्यांना दिल्लीत परतण्यास उशीर झाला, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. पीएम मोदी प्रचार झारखंडमधील प्रचारसभा आटोपून दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचल्यानंतर ही घटना घडली.
सुरक्षेबाबत खबरदारी म्हणून तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी सदर विमान लँड करण्यात आले. आदिवासी गौरव दिन आणि बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने आज पीए मोदी यांनी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, आज आज पंतप्रधानांनी झारखंडमध्ये दोन प्रचारसभांना संबोधित केले. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (Jharkhand Assembly Election 2024) २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
दुसऱ्या एका घटनेत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) कडून परवानगी न मिळाल्यामुळे सुमारे दोन तास जमिनीवरच राहिले. राहुल गांधी निवडणूक प्रचारसभांना संबोधित करण्यासाठी झारखंड दौऱ्यावर आहेत. ही घटना महगामा येथे घडली. जिथे राहुल गांधी एका प्रचार सभेला संबोधित करणार होते. सुमारे २ तासानंतर त्यांच्या विमानाला टेक ऑफ करण्यास परवानगी मिळाली.
यावरून काँग्रेस नेत्यांनी भाजपवर आरोप केला आहे. हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत भाजप जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.