नवी दिल्लीः नवी दिल्लीच्या बनसेरा पार्कमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी गौरव दिनानिमित्त आणि बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीच्या औचित्य साधून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याचे वेळी केंद्र सरकारने सराय काले खान चौकाचे नाव बदलून भगवान बिरसा मुंडा चौक करण्याचाही निर्णयही घेतला. यावेळी बोलताना, भगवान बिरसा मुंडा हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महान नायकांपैकी एक होते, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले. बिरसा मुंडा यांची जयंती दरवर्षी आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. २०२१ मध्ये केंद्र सरकारने ही घोषणा केली होती.
या कार्यक्रमाला अमित शाह यांच्यासह दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, दिल्लीतील खासदार आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, खासदार बासुरी स्वराज, खासदार कमलजीत सेहरावत, खासदार हर्ष मल्होत्रा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले की, जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण हे आपल्या जीवनाचे ध्येय बनविणाऱ्या धरती आबांनी आपल्या जीवनातून स्वसंस्कृती आणि मातृभूमीसाठी समांतर योगदान कसे देता येईल, हा संदेश दिला. त्यांचा हा भव्य पुतळा मातृभूमीसाठी त्यांच्या त्याग आणि बलिदानाचा साक्षीदार बनून भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तसेच नरेंद्र मोदी सरकारने आदिवासी भागाच्या विकासासाठी आणि आदिवासींच्या उत्थानासाठी खूप प्रयत्न केले आहेत, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांनी लहान वयातच राष्ट्र आणि आदिवासी लोकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले होते. भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन आपण दोन टप्प्यात बघतो. आदिवासी संस्कृतीचे रक्षण आणि त्याप्रती बांधिलकी हा पहिला टप्पा तर मातृभूमीचे स्वातंत्र्य आणि रक्षणासाठी केलेले सर्वोच्च बलिदान हा त्यांच्या जीवनाचा दुसरा टप्पा आहे. तरुण वयात बिरसा मुंडा यांनी आपल्या कर्तृत्व दाखवून दिले. त्यामुळे आज १५० वर्षांनंतरही संपूर्ण देश त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवली आणि आदिवासींच्या स्थितीकडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले, असेही ते म्हणाले.
अमित शाह यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे वजन ३ हजार किलो आहे. पश्चिम बंगालमधील दोन कारागिरांनी हा आकर्षक पुतळा तयार केला आहे.