

पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडच्या ८१ सदस्यीय विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील ३८ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. राज्यात सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) च्या नेतृत्वाखालील विरोधी 'इंडिया' आघाडी विरूद्ध भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) यांच्यात लढत आहे. १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) युती सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न करीत आहे, तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्यासह ५२८ उमेदवार ८१ विधानसभा जागांपैकी ३८ जागांवर निवडणूक लढवत आहेत. भाजपने ६८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर मित्रपक्ष ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन पक्षाने १०, जदयू २ आणि लोक जनशक्ती (रामविलास) एका जागेवर लढत आहे. इंडिया आघाडीतील पक्षांपैकी झारखंड मुक्ती मोर्चाने ४३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत, काँग्रेसने ३०, आरजेडीने ६ आणि सीपीआयने (ML) ४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शनिवारी मतमोजणी होणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०१९) झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ने ३० जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या, ज्या २०१४ मध्ये जिंकलेल्या ३७ जागांपेक्षा कमी होत्या. JMM-काँग्रेस-RJD आघाडीने ४७ जागांसह आघाडी सरकार स्थापन केले होते.
दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत ३१.३७ टक्के मतदान झाले.