

भोपाळ : तामिळनाडूतील स्रेसन फार्मास्युटिकल्सने बनवलेले ‘कोल्ड्रिफ’ नावाचे कफ सिरप प्यायल्याने 20 बालकांचा केवळ मध्य प्रदेशात मृत्यू झाला आहे. ‘डायइथिलीन ग्लायकोल’ या प्राणघातक रसायनाची मात्रा वापराच्या अनुमतीपेक्षा 486 पट अधिक असल्याचे रासायनिक पृथ्थकरणात आढळून आले आहे. त्याचबरोबर अन्य त्रुटी आणि घातक रसायनांचा वापर बालकांच्या जीवावर उठला आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक लहान मुलांच्या मृत्यूनंतर या सिरपची तपासणी करण्यात आली, ज्यात बंदी घातलेले घटक आणि विषारी रसायन असलेले हे सिरप घातक ठरले.
केंद्र सरकारने डिसेंबर 2023 मध्ये एक आदेश जारी केला होता. त्यानुसार क्लोरोफेनिरामाईन मलेएट आयपी 2 मि.लि. आणि फेनिलिफ्रीन एचसीएल आयपी 5 मि.लि. या औषधांच्या मिश्रणाचा वापर चार वर्षांखालील मुलांसाठी करू नये, असे आदेशात स्पष्ट नमूद केले होते. ‘कोल्ड्रिफ’ सिरपमध्ये हेच घटक आहेत, जे लहान मुलांसाठी वापरले जात होतेच. शिवाय, आदेश असूनही फार्मा कंपनीने त्यांच्या सिरपच्या लेबलवर यासंबंधी आवश्यक इशारा छापली नाही. या कंपनीसोबत अनेक कंपन्यांनी या नियमाचे उल्लंघन केले आहे.
लक्षणे : उलटी, पोटदुखी, कमी लघवी होणे. गंभीर अवस्थेत मूत्रपिंड निकामी होणे, झटके येणेे.
जोखीम : लहान मुलांसाठी हे रसायन अल्प प्रमाणातही जीवघेणे ठरू शकते.
‘कोल्ड्रिफ’ बनवणार्या स्रेसन फार्मास्युटिकल्सकडे जागतिक आरोग्य संघटनेचे चांगले उत्पादन पद्धती प्रमाणपत्र नव्हते. सीडस्कोच्या तपासणीत कंपनीच्या कारखान्यात डेगमोने भरलेले कंटेनर आढळले, त्यामुळे ते सिरपमध्ये भेसळ करत असल्याचे सिद्ध झाले.
भारतातील बळी : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ‘कोल्ड्रिफ’ सिरपमुळे अनेक मुलांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. (उदा., मध्य प्रदेशमध्ये 20 मृत्यू)
जगभरातील संकट : जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, दूषित कफ सिरपमुळे 2022 पासून जगभरात किमान 300 हून अधिक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
पूर्वीची घटना : 2020 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील रामनगर जिल्ह्यात एका दूषित सिरपमुळे 17 मुलांचा मृत्यू झाला होता.