

Jammu Kashmir Encounter latest news
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाडमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. किश्तवाड जिल्ह्यातील चतरू येथील सिंगपोरा भागात ही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी या भागात तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले होते, त्यातील दोखांचा आता खात्मा केला आहे.
सुरक्षा यंत्रणांना चतरूच्या सिंगपोरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. स्वतःला वेढलेले पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही याला प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असताना दोन दहशतवाद्यांना ठार केले. 'ऑपरेशन ट्रॅशी' असे सांकेतिक नाव या संयुक्त मोहिमेला दिले आहे. गोळीबार सुरू झाल्यानंतर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील नादिर गावात गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने आज ही कारवाई केली. चकमकीत ठार झालेले तिन्ही दहशतवादी पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी होते.