जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; किश्तवाडमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा, अखनूरमध्ये लष्करी अधिकारी शहीद
पुढारी ऑनलाईन डेस्क : Jammu Kashmir Encounter | जम्मू-काश्मीर मधील अखनूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ९ पंजाब रेजिमेंटचे जेसीओ कुलदीप चंद शहीद झाले. शुक्रवारी रात्री उशिरा अखनूरच्या केरी बट्टल भागात ही चकमक झाली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. त्याचवेळी किश्तवाड जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्रीपासून ऑपरेशन सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मारले गेलेले तिन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते. त्यात टॉप कमांडर सैफुल्लाहचाही समावेश आहे.
अखनूरच्या केरी बट्टलमध्ये शुक्रवारी रात्री सीमेपलीकडून पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला. त्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. अतिरिक्त सैन्य तैनात केले असून शोध मोहीम सुरू आहे. याच भागात ११ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एका कॅप्टनसह दोन लष्करी जवान शहीद झाले होते.
शहीद जेसीओ कुलदीप चंद यांना लष्कराकडून श्रद्धांजली
भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने शहीद जेसीओ कुलदीप चंद यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. लष्कराने ट्विट केले आहे की, "जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) व्हाईट नाईट कॉर्प्स आणि सर्व रँक ९ पंजाबचे जवान कुलदीप चंद यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करतात. ११ एप्रिल २०२५ च्या रात्री सुंदरबनीच्या केरी-बट्टल भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरी विरोधी मोहिमेचे शौर्याने नेतृत्व करताना त्यांनी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या पथकाच्या शौर्यामुळे आणि सब कुलदीप यांच्या बलिदानामुळे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पडला. या दुःखाच्या वेळी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत."

