

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कटरा येथून काश्मिरसाठी पहिली वंदे भारत ट्रेन झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली.
यावेळी 272 किलोमीटरच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाच्या पूर्णत्वाचीदेखील घोषणा करण्यात येणार आहे. जम्मू-कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीला कटराहून चालवली जाईल, कारण जम्मू रेल्वे स्थानकाचे सध्या नूतनीकरण सुरू आहे.
जम्मूमध्ये पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की, "पंतप्रधान मोदी 19 एप्रिल रोजी उधमपूरला येणार आहेत. ते जगातील सर्वांत उंच रेल्वे पुलाला भेट देतील आणि त्याचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते कटराहून वंदे भारत ट्रेनला झेंडा दाखवतील."
या उद्घाटनामुळे काश्मीरसाठी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार आहे. सध्या केवळ संगलदान-बारामुल्ला आणि कटरा ते देशभरातील विविध स्थळांदरम्यान रेल्वे सेवा कार्यरत आहेत.
या प्रकल्पात 38 बोगदे असून, त्यांची एकूण लांबी 119 किलोमीटर आहे. यातील टनेल T-49 हा सर्वात लांब बोगदा असून, त्याची लांबी 12.75 किलोमीटर आहे. हा देशातील सर्वात लांब परिवहन बोगदा आहे.
आयकॉनिक चिनाब पुलाचाही समावेश
प्रकल्पात 927 पूल असून, त्यांची एकत्रित लांबी 13 किलोमीटर आहे. यामध्ये आयकॉनिक चिनाब पूल देखील आहे, जो 1315 मीटर लांब, 467 मीटर कमान असलेला आणि नदीपात्राच्या 359 मीटर उंचीवर असलेला आहे. हा आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असून, जगातील सर्वात उंच कमानी रेल्वे पूल म्हणून ओळखला जाईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रेल्वे प्रकल्प गेल्या महिन्यात पूर्ण झाला असून, कटरा-बारामुल्ला मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी झाली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी जानेवारीमध्ये कटरा-काश्मीर दरम्यान ट्रेन सेवेची मंजुरी दिली होती.
वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू-श्रीनगरमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि हा भाग एका आधुनिक व प्रभावी रेल्वे सेवेशी जोडला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, काश्मीरला रेल्वेने जोडण्याच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात 1997 मध्ये झाली होती, पण भौगोलिक, भौमितिक आणि हवामानाशी संबंधित अडचणींमुळे अनेक वेळा विलंब झाला.