

पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी (प्रायव्हेट सेक्रेटरी) निधी तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही नियुक्ती केली असून याबाबतचे निवेदनही जारी केले आहे.
निधी तिवारी या नोव्हेंबर 2022 पासून पंतप्रधान कार्यालयात (PMO) उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निरस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात अवर सचिव होत्या.
केंद्र सरकारने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निधी तिवारी या 2014 बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत. त्या प्रामुख्याने परराष्ट्र व्यवहार, अणुऊर्जा आणि सुरक्षा व्यवहार यासह राजस्थान राज्याशी संबंधित कामकाज पाहत होत्या.
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) 29 मार्च रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने मंजूर केली आहे.
दरम्यान, आतापर्यंत विवेक कुमार आणि हार्दिक सतीशचंद्र शहा हे दोन अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खासगी सचिव म्हणून काम पाहत होते.
निधी तिवारी यांनी 2013 च्या सिव्हिल सेवा परीक्षेत 96 वा क्रमांक मिळवला होता. त्या वाराणसीच्या मेहमूरगंज येथील रहिवासी आहेत. वाराणसी हा 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे.
सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी, त्या वाराणसीत सहाय्यक आयुक्त (वाणिज्य कर) म्हणून कार्यरत होत्या आणि नोकरी करत परीक्षेची तयारी करत होत्या.