

jammu and kashmir srinagar mehbooba mufti daughter iltija praise on ranveer singh akshaye khanna dhurandhar movie
मुंबई : पुढारी ऑनलाईन
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण झाला असून, हा चित्रपट बॉक्स ऑफिसपासून प्रेक्षकांपर्यंत आणि समीक्षकांच्या चर्चेत आहे. चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असले तरी, त्याच्या विषयावरून काही वादही निर्माण झाले आहेत. विशेषतः चित्रपटात दाखवलेल्या राजकारणावर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत मांडलेल्या दृष्टिकोनावरून टीका होत आहे.
रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे अनेकजण भरभरून कौतुक करत आहेत. मात्र, काही लोकांकडून चित्रपटावर टीकाही होत आहे. अशातच पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी ‘धुरंधर’चे कौतुक केले आहे. इल्तिजांकडून अशी प्रतिक्रिया येणे अनेकांसाठी अनपेक्षित ठरले आहे. इल्तिजा या जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या कन्या आहेत. आपल्या स्पष्ट आणि निर्भीड मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इल्तिजांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाची कथा, अभिनय आणि विशेषतः महिला पात्रांच्या मांडणीचे मनापासून कौतुक केले आहे.
आपल्या पोस्टमध्ये इल्तिजा म्हणाल्या की, ‘धुरंधर’भोवती झालेला वाद आणि संमिश्र प्रतिक्रिया असूनही, त्यांना हा चित्रपट वैयक्तिकरित्या अत्यंत रंजक आणि प्रभावी वाटला. त्यांना सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे चित्रपटातील कास्टिंग, जी त्यांच्या मते अगदी परफेक्ट आहे.
इल्तिजा मुफ्ती नेमके काय म्हणाल्या?
इल्तिजांनी पोस्टमध्ये लिहिले, “धुरंधरवरून खूप गोंधळ झाला, पण मला हा चित्रपट खूप आवडला आणि तो रंजक वाटला. विशेषतः त्याची कास्टिंग एकदम परफेक्ट आहे. इतर अनेक हिंसक बॉलिवूड चित्रपटांप्रमाणे या चित्रपटात महिलांना केवळ शोपीस किंवा दिखाव्यासाठी वापरलेले नाही. हा एक खूप चांगला चित्रपट आहे.” त्यांच्या या विधानातून महिला पात्रांच्या मांडणीत चित्रपटात आलेला परिपक्व आणि सकारात्मक बदल स्पष्ट होतो.
लोकांच्या विविध प्रतिक्रिया
मात्र इल्तिजांची ही पोस्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. एका युजरने लिहिले, “सूर्य पश्चिमेकडून उगवायला लागला का?”
दुसऱ्या युजरने म्हटले, “हे कधी झालं? तुमचं अकाउंट कुणी हॅक केलं नाही ना?”
एका अन्य युजरने बारामुल्ला फिल्म पाहण्याचा सल्ला देत, त्यानंतर मत मागितले. काही युजर्सनी यामागे राजकारण असल्याचा आरोप केला, तर काहींनी इल्तिजा सध्या चर्चेत राहण्यासाठी असे विधान करत असल्याचे म्हटले.
‘धुरंधर’मधील अभिनेत्रींच्या भूमिकांवर वाद
या चित्रपटात रहमान डकैतच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडन तसेच इतर अभिनेत्रींच्या छोट्या भूमिकांवरूनही सोशल मीडियावर ट्रोलिंग झाली होती. काही युजर्सचे म्हणणे होते की, चित्रपटात अभिनेत्रींची ठोस भूमिका नाही आणि केवळ ‘वुमन कार्ड’ खेळण्यासाठी त्यांना कास्ट करण्यात आले आहे.
यावर सौम्या टंडन यांनी ठाम शब्दांत प्रत्युत्तर देत सांगितले की, भूमिका जरी छोटी असली तरी या चित्रपटात इतर चित्रपटांप्रमाणे समुद्रकिनारी लहान कपड्यांत नाचणाऱ्या अभिनेत्री दाखवण्यात आलेल्या नाहीत. या चित्रपटात ग्लॅमरपेक्षा वास्तववादी मांडणीला प्राधान्य देण्यात आले आहे.
एकुणच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून, येणाऱ्या काळात तो कोणते नवे विक्रम प्रस्थापित करण्यात यशस्वी होतो हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.