

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले. तर एक जवान गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (jammu and kashmir ied blast)
माहितीनुसार, मंगळवारी (दि. 11) दुपारी साडेतीन वाजता जम्मू जिल्ह्यातील खोर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या केरी बट्टल परिसरात नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोट झाला. यामध्ये तीन सैनिक जखमी झाले, ज्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे पथक गस्त घालत होते. यावेळी दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. त्यात तीन सैनिक जखमी झाले. माहिती मिळताच, अतिरिक्त लष्करी तुकडी घटनास्थळी पोहोचली आणि जखमी सैनिकांना रुग्णालयात नेल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली.
स्फोटाच्या एक दिवस आधी सोमवारी (दि. 10) राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) दुपारी 2.40 वाजता नियंत्रण रेषेपलीकडून गोळीबार झाला. या हल्ल्यात नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात एका चौकीवरील तैनात असलेला जवान गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याआधी 8 फेब्रुवारी रोजी, केरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेच्या पलीकडे असलेल्या जंगलातून दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला होता, जे या बाजूला घुसण्याची संधी शोधत होते. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील कर्नह भागात सोमवारी (दि. 11) सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नह तहसीलमधील बडी मोहल्ला अमरोही येथे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी एक एके 47, एक मॅगझिन, एक सायगा एमके रायफल, एक सायगा एमके मॅगझिन आणि 12 राउंड जप्त केले.