पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालावरून अदानी समूहावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच याबद्दल संयुक्त संसदीय कमिटीची (जेपीसी) बोलावण्याची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडिया 'X' प्लॅटफॉर्मवर लिहिले कि, स्वीस येथील असणाऱ्या पाच खात्यांमध्ये 311 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 2,610 कोटी रुपये जमा करण्यात आले. 28 डिसेंबर 2021 पासून ही चौकशी सुरू होती. यासोबतच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंतीही केली आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, 9 ऑगस्ट 2024 रोजी स्विस फेडरल क्रिमिनल कोर्टाच्या आदेशात, ही खाती गोठवण्याचा अर्ज नाकारण्यात आला आणि त्याचे वर्णन “अपारदर्शक निधी” म्हणून करण्यात आले. न्यायालयाच्या दृष्टीने, या निधीमध्ये मनी लाँड्रिंग आणि घोटाळा यासह बेकायदेशीर क्रियाकलापांमधून मिळालेला निधी असल्याचा संशय आहे. अदानी समूहावर अनेक वर्षांपासून असा आरोप होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आरोप केला की, चांग यांचे अदानी समूहाशी असलेले जवळचे संबंध कोणापासूनही लपलेले नाहीत. ते म्हणाले की, ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) च्या तपासणीत असे दिसून आले आहे की चांग आणि त्याचा सहकारी नासिर अली शाबान अहली यांनी इंडोनेशियातून अदानीने आयात केलेल्या कोळशाची किंमत 52 टक्क्यांनी वाढवली आहे. त्यांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही स्वित्झर्लंडमधील अदानी समूहाच्या सहयोगींची पाच खाती गोठवल्याप्रकरणी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. अदानी प्रकरण आपल्या नियंत्रणाखाली घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. तसेच, त्याच्या संपूर्ण व्याप्तीची चौकशी करण्यासाठी तातडीने जेपीसी बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, हे स्पष्ट आहे की पंतप्रधान आपल्या मित्राच्या समृद्धीसाठी आणि संरक्षणासाठी कटिबद्ध आहेत. स्वित्झर्लंड, श्रीलंका आणि बांगलादेशात भारताच्या प्रतिष्ठेला तडा गेल्याची त्यांना पर्वा नाही.