Jagdeep Dhankhar resignation : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंजूर; गृह मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत कळवले होते.
Jagdeep Dhankhar resignation
Jagdeep Dhankhar resignationfile photo
Published on
Updated on

Jagdeep Dhankhar resignation

दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून आपल्या पदाचा राजीनामा देण्याबाबत कळवले होते. त्यांनी राजीनाम्यामागे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले आहे. मंगळवार राज्यसभेला कळवण्यात आले की उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारला आहे. तसेच गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये राजीनामा तात्काळ लागू होईल.

धनखड यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करून धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. 'जगदीप धनखड यांना भारताचे उपराष्ट्रपती म्हणून तसेच इतर अनेक भूमिकांमधून देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.'

सभापती पद आपोआप रिक्त

उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याने राज्यसभेचे सभापतीपदही आपोआप रिक्त झाले आहे. उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे आता राजीनामा मंजूर झाल्याने, पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचे संपूर्ण कामकाज उपसभापती हरिवंश पाहतील. याशिवाय, राष्ट्रपतींनी अधिकृत केलेल्या सदस्यालाही ही जबाबदारी दिली जाऊ शकते.

सहा महिन्यांत पोटनिवडणूक आवश्यक

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सहा महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. संविधानानुसार, मृत्यू, राजीनामा, पदावरून दूर करणे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास, ते भरण्यासाठी निवडणूक लवकरात लवकर घेण्याची तरतूद आहे.

कार्यकाळात राजीनामा देणारे तिसरे उपराष्ट्रपती

कार्यकाळ सुरू असताना राजीनामा देणारे धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत. यापूर्वी व्ही. व्ही. गिरी यांनी २० जुलै १९६९ रोजी आणि आर. वेंकटरामन यांनी २४ जुलै १९८७ रोजी पदाचा राजीनामा दिला होता. या दोघांनीही राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यासाठी हे पाऊल उचलले होते. तर, माजी उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे कार्यकाळातच निधन झाले होते.

सोमवारी दिवसभर राज्यसभेत होते सक्रिय

यापूर्वी सोमवारी धनखड दिवसभर राज्यसभेत सक्रिय होते. सकाळी त्यांनी विरोधकांना संसदेला संवाद आणि चर्चेचे सकारात्मक व्यासपीठ बनवण्याचा सल्ला दिला आणि दुपारनंतर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाची नोटीस स्वीकारून संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली. तसेच, न्यायमूर्ती शेखर यादव यांच्याविरोधात सादर झालेल्या महाभियोग नोटिशीमधील एका खासदाराच्या दुहेरी सहीच्या प्रकरणाची चौकशी करण्याचेही त्यांनी जाहीर केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news