Jagannath Puri | जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याची 48 वर्षांनी होणार मोजणी

रिझर्व्ह बँकेचे अधिकारी करणार देखरेख
Jagannath Puri |
Jagannath Puri | जगन्नाथ मंदिराच्या खजिन्याची 48 वर्षांनी होणार मोजणी
Published on
Updated on

पुरी (ओडिशा); वृत्तसंस्था : येथील श्री जगन्नाथ मंदिरातील बहुप्रतीक्षित ‘रत्नभांडार’ (खजिना) मोजणी आणि यादीकरण प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे. ओडिशा राज्य सरकारने 25 मार्च 2026 रोजी दुपारी सव्वाबारा ते पावणेदोन या वेळेत या प्रक्रियेची अधिकृत सुरुवात निश्चित केली आहे. तब्बल 48 वर्षांनंतर ही मोजणी होत असल्याने देशभरात उत्सुकता आहे.

यापूर्वी 1978 मधील मोजणीनुसार, रत्नभांडारात सुमारे 128.38 किलो सोन्याचे आणि 221.53 किलो चांदीचे दागिने व अलंकार होते. त्या वेळी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 72 दिवस लागले होते. 2018 मध्ये खजिना उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र किल्ली हरवल्याचे सांगण्यात आल्याने वाद निर्माण झाला. तत्कालीन कायदामंत्री प्रताप जेना यांनी विधानसभेत सांगितले होते की खजिन्यात 12,831 भरी (1 भरी म्हणजे 11.66 ग्रॅम) सोन्याचे दागिने असून, त्यात मौल्यवान रत्ने जडवलेली आहेत. तसेच 22,153 भरी चांदीची भांडी व वस्तू असल्याची माहिती दिली होती. 18 जुलै 2024 रोजी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या 11 सदस्यीय समितीने सकाळी 9.15 वाजता अंतर्गत रत्नभांडारात प्रवेश केला. तेथे काही पेट्यांमध्ये सोने होते. तो खजिना बाहेर काढून महाप्रभूंच्या शयनकक्षात हलविण्यात आला.

कशी होणार संपूर्ण प्रक्रिया?

मंदिराचे मुख्य प्रशासक अरविंद पाधी यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मोजणी प्रक्रिया फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीद्वारे नोंदवली जाईल. रिझर्व्ह बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी देखरेख करतील. राष्ट्रीयीकृत बँकांकडून नोंदणीकृत सुवर्णकार उपलब्ध करून दिले जातील. राज्य सरकार दोन रत्नतज्ज्ञ (जेमोलॉजिस्ट) नियुक्त करणार आहे. सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंसाठी स्वतंत्र पेट्या असतील. 10 जणांची टीम दागिन्यांचे वर्गीकरण करून पेट्यांमध्ये ठेवेल. दररोज खजिन्याची किल्ली खजिनागारातून दंडाधिकार्‍याकडून आणली जाईल आणि काम संपल्यानंतर त्याच दिवशी परत जमा केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news