

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूर येथे मुख्यालय असलेली माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेवा क्षेत्रातील मोठी कंपनी विप्रो मोठ्या प्रमाणात फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात 'कॅम्पस इंटरव्ह्यू'द्वारे १० हजार ते १२ हजार फ्रेशर्सची नियुक्ती केली जाईल, असे विप्रोकडून १७ जानेवारी रोजी सांगण्यात आले. याबाबतचे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.
"एका तिमाहीत बदल होऊ शकतात. पण प्रत्येक आर्थिक वर्षात १० हजार- १२ हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली जाईल," असे विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की चालू आर्थिक वर्षात कॅम्पसद्वारे सुमारे १० हजार जणांची भरती केली जाईल. "आम्ही (तिसऱ्या तिमाहीपर्यंत) सुमारे ७ हजार जणांची भरती केली आहे. पुढील तिमाहीत आम्ही अडीच ते तीन हजार जणांची करण्याचा विचार करत आहोत."
आयटी क्षेत्रातील विप्रोची प्रतिस्पर्धी कंपनी इन्फोसिसने १६ जानेवारी रोजी सांगितले होते की, कंपनी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये सुमारे २० हजार फ्रेशर्सची नियुक्ती करेल. यातून मागणीत सुधारणा आणि अनेक क्षेत्रांमध्ये विवेकाधीन खर्चाचे पुनरुज्जीवन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
"आम्हाला अशा जॉब ऑफर्स द्यायच्या नाहीत ज्या आम्ही स्वीकारू शकणार नाही. याची जाणीव आम्हाला झाली आहे. आम्हाला अधिक सावध राहायला हवे. पण अधिक सुसंगत राहू. अशी आमची भूमिका आहे," असे गोविल म्हणाले.
विप्रो दर तिमाहीत अडीच हजार ते ३ हजार फ्रेशर्सची नियुक्ती करत राहील, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. गोविल पुढे नमूद केले की, कंपनीने सर्व प्रलंबित ऑफर स्वीकारल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून 'स्टॉप- स्टार्ट' दृष्टिकोन अवलंबिला असून नियमित कॅम्पस भरती पुन्हा सुरू केली आहे.
विप्रो एल१ (फ्रेशर-लेव्हल) भरती करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करत आहे. ज्यात अंशतः मनुष्यांची मदत लागेल. ही प्रक्रिया कंपनीच्या भरती पद्धतीतील एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते, असेही ते म्हणाले.
जगभरातील टेक कंपन्यांनी गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली. विशेषतः २०२३ हे वर्ष जगभरातील टेक व्यवसायिकांसाठी आव्हानात्मक ठरले. देशभरातील दिग्गज आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. पण आता आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात फ्रेशर्सना संधी देणे सुरु केले आहे.