

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताची महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिम २०२५ मध्ये प्रक्षेपित होणार असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र भारताच्या अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी ही मोहिम लांबणीवर पडल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रो अध्यक्ष सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मधील भारताची गगनयान मोहिम २०२६ मध्ये प्रक्षेपित केली जाणार असल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी आगामी मोहिमांसाठी सुधारित टाइमलाइन जाहीर केली. भारताची महत्त्वाकांक्षी गगनयान मोहीम, देशाचा पहिला क्रूड स्पेसफ्लाइट कार्यक्रम, पूर्वीच्या नियोजित प्रमाणे २०२५ मध्ये प्रक्षेपित होणार नाही. तर 2026 पर्यंत इस्रोच्या या सर्व मोहिमा पुढे ढकलण्यात आल्याचे इस्रोने म्हटले आहे.
इस्रो अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी आकाशवाणी (AIR) येथे सरदार पटेल स्मृती व्याख्यानादरम्यान अवकाश कार्यक्रमांचे वेळापत्रक नव्याने जाहीर केला. यावेळी सोमनाथ यांनी अवकाश मोहीम प्रक्षेपणातील विलंब हा मिशनची सुरक्षा आणि यश सुनिश्चित करण्यासाठी इस्रोची बांधिलकी दर्शवितो. अंतराळ संस्थेने मानवी अंतराळ उड्डाणासाठी सावधगिरी बाळगली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गगनयान मोहीमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित करण्यासाठी एक्सिओम स्पेसमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. ते SpaceX च्या ड्रॅगन अंतराळयानातील उडत्या प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक प्रवासासाठी इतर तीन अंतराळवीरांसोबत प्रक्षेपित घेतील. गगनयान प्रक्षेपण तारखा बदलाबरोबरच सोमनाथ यांनी इस्रोच्या इतर महत्त्वाच्या प्रकल्प प्रक्षेपणाच्या तारखा देखील जाहीर केल्या आहेत.
गगनयान: मानवयुक्त अंतराळ मोहीम आता 2026 ला होणार आहे.
चांद्रयान-4: नमुना परतीची मोहीम 2028 साठी नियोजित आहे.
निसार: भारत-अमेरिका संयुक्त मोहीम 2025 मध्ये प्रक्षेपित होणार आहे.