

ISRO PSLV C62
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)चे पीएसएलव्ही-सी६२ मिशन अयशस्वी झाले आहे. रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले, परंतु तिसऱ्या टप्प्यानंतर माहिती मिळण्यास विलंबित झाला. तर चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर रॉकेटची दिशा बदलली आणि कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे उपग्रह वेगळा झाला की नाही हे स्पष्ट होत नाहीय.
इस्रोने आज २६० टन वजनाचे पीएसएलव्ही-सी६२ रॉकेट प्रक्षेपित केले, ज्यामध्ये अन्वेषा उपग्रह आणि इतर १४ उपग्रह अंतराळात सोडले गेले, परंतु प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाला. या वर्षातील हे पहिलेच प्रक्षेपण आहे. पृथ्वी निरीक्षण उपग्रह अन्वेषा आणि इतर १४ उपग्रह आज श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रावरून कक्षेत ठेवण्यात येणार होते. परंतु त्यापूर्वीच, रॉकेट त्याच्या इच्छित मार्गावरून विचलित झाले, ज्याचा इस्रो टीमकडून तपास सुरू आहे.
अन्वेषा उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी झाले, त्यानंतर इस्रो प्रमुखांनी एक निवेदन जारी केले. इस्रो प्रमुख म्हणाले, "तिसऱ्या टप्प्यात एक समस्या आली आणि दिशा बदलली. डेटा विश्लेषण सुरू आहे आणि अपडेट दिले जातील."
अन्वेषा हा एक हायपरस्पेक्ट्रल उपग्रह आहे तो संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केला आहे. साध्या सॅटेलाईट फोटोंच्या तुलनेत, हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग हे मानवी डोळ्यांना न दिसणारे तपशीलदेखील शोधू शकणार होते.
हे तंत्रज्ञान प्रकाशाच्या शेकडो अति सूक्ष्म पट्ट्यांचा वापर करते, ज्यामुळे जमिनीवरील प्रत्येक वस्तूचा स्वतःचा एक वेगळा 'फिंगरप्रिंट' तयार होतो. शास्त्रज्ञ या 'बारकोडस्'ची तुलना शुद्ध नमुन्यांशी करतात, ज्यामुळे मातीचे प्रकार, वनस्पती किंवा मानवनिर्मीत वस्तूंची अचूक ओळख पटते.
हे तंत्रज्ञान मातीचे प्रकार (उदा. वाळवंट की चिकणमाती) ओळखते, ज्यामुळे रणगाडे किंवा सैनिकांच्या हालचालींसाठी सुरक्षित मार्ग ठरवता येतात. शत्रूचा छलावरण किंवा बनावट आवरणे या उपग्रहाच्या नजरेतून वाचू शकत नाहीत. हे उपग्रह नैसर्गिक वनस्पती आणि कृत्रिम आच्छादन यातील फरक ओळखू शकतात.