

Railway Ticket Booking New Rule: रेल्वे तिकीट बुकिंगमधील घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठं पाऊल उचललं आहे. आता अॅडव्हान्स रिजर्वेशन पीरियड अर्थात ARP च्या ऑपनिंग डेला ऑनलाईन तिकीट बुकिंग फक्त आधार लिंक असलेल्या IRCTC अकाऊंटवरूनच शक्य होणार आहे. ज्या प्रवाशांचे अकाऊंट आधार लिंक नाहीये. त्यांना फक्त ठरलेल्या वेळेतच तिकीट बुकिंग करता येणार आहे.
२९ डिसेंबर २०२५ पासून अॅडव्हान्स रिजर्वेशन पीरियडच्या ओपनिंग डेला सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२ पर्यंत फक्त आधार लिंक युजर्सनाच ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार आहे. त्याचबरोबर ५ जानेवारी २०२६ पासून ही वेळी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. तर १२ जानेवारीपासून ओपनिंग डे दिवशी ज्यांचे अकाऊंट आधार व्हेरिफाईड आहे त्यांनाच सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार आहे.
रेल्वे प्रशासनानं हा नियम केवळ ऑनलाईन बुकिंगसाठी लागू असल्याचं सांगितलं. पॅसेंजर रिजर्वेशन सिस्टम काऊंटर तिकीट बुकिंग नियमात सध्या कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
रेल्वे तिकीट बुकिंगमधील काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेने आतापर्यंत सुमारे ३ कोटी बनावट (Fake) आयआरसीटीसी खाती बंद केली आहेत. आणखी ३ कोटी संशयास्पद खात्यांची ओळख पटली असून, एकूण ६ कोटी खाती निष्क्रिय करण्याची प्रक्रिया रेल्वेकडून सुरू आहे. आधार-आधारित व्हेरिफिकेशनमुळे खऱ्या प्रवाशांना प्राधान्य मिळेल आणि एजंटकडून होणारी मोठ्या प्रमाणातील बुकिंग रोखली जाईल. बनावट प्रोफाईलद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी जानेवारी २०२६ पासून नवीन नियम अधिक कडकपणे लागू केले जातील.
प्रवाशांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आपले IRCTC खाते वेळेत आधारशी लिंक करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.