

Strait of Hormuz India safe passage Mohammad Fathali
नवी दिल्ली : पश्चिम आशियात युद्धाचे भडका उडाला आहे. इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला आहे. पण या संकट काळातही इराणने भारतासाठी मैत्रीचा हात पुढे केला आहे. ‘भारत आमचा मित्र आहे आणि त्यांच्या जहाजांना कोणताही धोका पोहोचणार नाही,’ असे इराणने स्पष्ट केले आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग मानल्या जाणाऱ्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Hormuz Strait) मधून भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता देण्याची मोठी घोषणा इराणच्या राजदूतांनी केली आहे.
राजदूतांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढता दबदबा आणि इराण-भारत संबंधांच्या मजबुतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा पर्शियन आखात आणि ओमानच्या आखाताला जोडणारा एक अरुंद पण अत्यंत मोक्याचा जलमार्ग आहे. भारतासाठी तो अत्यंत महत्वाचा आहे.
ऊर्जा सुरक्षा : भारताला मिळणाऱ्या एकूण कच्च्या तेलाचा मोठा हिस्सा याच मार्गावरून येतो.
व्यापार : भारताची अनेक व्यापारी जहाजे याच मार्गाने आखाती देशांकडे रवाना होतात.
जागतिक परिणाम : जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20 % ते 30% तेल याच चिंचोळ्या मार्गातून जाते.
इराणच्या राजदूतांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भारताचे आभार मानले. ते म्हणाले, ‘इराण आणि भारताचे हितसंबंध आणि श्रद्धा सारख्याच आहेत. कठीण काळात आणि युद्धाच्या परिस्थितीत भारत सरकारने आम्हाला विविध क्षेत्रात मोठी मदत केली आहे. ही मैत्री केवळ राजनैतिक नसून ती विश्वासावर टिकून आहे.’
सध्या तांबड्या समुद्रात (Red Sea) आणि पर्शियन आखातात जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे विमा कंपन्यांनी जहाजांचे दर वाढवले आहेत, तर अनेक देशांनी आपले मार्ग बदलले आहेत. अशा परिस्थितीत इराणने स्वतःहून भारताला सुरक्षिततेची हमी देणे, हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि जलवाहतूक क्षेत्रासाठी खूप मोठा दिलासा मानला जात आहे.
'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. इलाही म्हणाले की, इराणविरुद्ध पुकारलेले हे युद्ध थांबवण्यासाठी जगातील बड्या नेत्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर दबाव आणला पाहिजे. या युद्धामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून जगभरातील सर्वसामान्य जनतेला त्याचे चटके सोसावे लागत आहेत. ते पुढे म्हणाले, ‘ज्यांनी हे युद्ध सुरू केले, त्यांनीच ते थांबवले पाहिजे. हे अन्यायकारक युद्ध त्वरित थांबवण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्र येणे काळाची गरज आहे.’
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत अनेक भीषण वळणे आली आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते आयतौल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती अधिकच स्फोटक झाली. इराणने प्रत्युत्तर म्हणून आखाती देशांमधील अमेरिकन आणि इस्रायली तळांना लक्ष्य केले, ज्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे.
इराणच्या लष्करी मुख्यालयाने (खातम अल-अंबिया) कडक इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने किंवा इस्रायलने इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर किंवा बंदरांवर हल्ला केला, तर त्याचे परिणाम भीषण होतील. अशा परिस्थितीत संपूर्ण आखाती क्षेत्रातील तेल आणि वायू प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची धमकी इराणने दिली आहे.
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनीही होर्मुजच्या सामुद्रधुनीचा वापर दबावतंत्र म्हणून सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘शत्रूला जेथे अनुभव कमी आहे आणि जिथे ते कमकुवत आहेत, अशा ठिकाणी नवीन आघाड्या उघडण्याबाबत आमचा अभ्यास पूर्ण झाला आहे.’