

ips satish golcha become delhi new police commissioner
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना गुरुवारी (२१ ऑगस्ट) नवे पूर्णवेळ प्रमुख मिळाले. तिहार तुरुंगाचे महासंचालक (DG) सतीश गोलचा यांची दिल्ली पोलिसांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते आयपीएस एस. बी. के. सिंह यांची जागा घेतील. गोलचा यांना दिल्ली पोलिसांत कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते दिल्ली-केंद्रशासित प्रदेश केडरच्या १९९२ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी अरुणाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणूनही काम पाहिले आहे.
गोलचा यांची नियुक्ती अशा महत्त्वपूर्ण वेळी झाली आहे, जेव्हा एक दिवसापूर्वीच, बुधवारी (२० ऑगस्ट) मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेनंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून, पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
आयपीएस सतीश गोलचा यांच्या नियुक्तीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, त्यांना पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पुढील आदेशापर्यंत दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांमध्ये पोलीस उपायुक्त (DCP), सहआयुक्त (Joint CP) आणि विशेष आयुक्त (Special CP) यांसारख्या महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे.
त्यांनी विशेष आयुक्त (गुप्तचर विभाग) म्हणून जबाबदारी सांभाळण्यासोबतच, ईशान्य दिल्लीतील दंगलींच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. सतीश गोलचा यांनी अरुणाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. त्यांना दिल्ली पोलीस आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रदीर्घ प्रशासकीय आणि पोलीस सेवेचा अनुभव आहे. गोलचा हे कडक शिस्तीचे, परंतु व्यवहार्य अधिकारी म्हणून ओळखले जातात.
आयपीएस एस. बी. के. सिंह यांच्याकडे याच वर्षी ३१ जुलै रोजी दिल्ली पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. दिल्ली-केंद्रशासित प्रदेश केडरच्या १९८८ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले सिंह हे गृहरक्षक दलाचे (होमगार्ड) महासंचालक आहेत. ते केवळ सहा महिन्यांतच सेवानिवृत्त होणार आहेत.
त्यामुळे आता सतीश गोलचा यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. एस. बी. के. सिंह यांनी आयपीएस संजय अरोरा यांची जागा घेतली होती. अरोरा ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले असून, ते १९८८ च्या तुकडीचे तमिळनाडू केडरचे अधिकारी होते.