नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता २८ नोव्हेंबर रोजी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. शपथविधीसाठी राज्याची राजधानी रांचीमध्ये तयारी पूर्ण करण्यात आली आहे. झारखंडच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
मंगळवारी (दि.26), झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला निमंत्रण देण्यासाठी या सर्व नेत्यांची शिष्टाचार भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यतिरीक्त राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीपीआय-एमएल नेते दीपंकर भट्टाचार्य आणि पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, आणि जम्मू आणि काश्मीर, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसह विविध प्रमुख राजकीय व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहेत.