

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई...' या १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या विश्वात्मा या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या बोलाप्रमाणे सध्या सोशल मीडियावर एक अमेरिकन मुलगी आणि भारतीय मुलाची लव्हस्टोरी चर्चेत आहे. प्रेमाला देश, भाषा, वय किंवा अंतर याची बंधनं नसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. ही सुंदर प्रेमाची गोष्ट आहे अमेरिकेतील जॅकलिन फोरेरो आणि भारताच्या आंध्र प्रदेशमध्ये राहणाऱ्या चंदनची.
जॅकलिन ही अमेरिकेतील फोटोग्राफर आहे. एक दिवस इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना तिचं चंदनच्या प्रोफाइलकडे लक्ष गेलं. चंदनचा प्रोफाइल पाहून तिने Hi... म्हणून बोलायला सुरूवात केली. हळूहळू दोघांचे देश वेगळे, वेळा वेगळ्या... पण मनं मात्र जुळली. १४ महिने ऑनलाईन बोलणं, एकमेकांना समजून घेणं अशा अभासी जगातच सुरू होतं. १४ महिन्यांनी जॅकलिन स्वतः आईला घेऊन भारतात आंध्र प्रदेशच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या चंदनला भेटायला आली. आता हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे जॅकलिन वयाने चंदनपेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे. इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या या प्रेमाची आज सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 'प्रेम असंच असतं... अनपेक्षित, खरं आणि जगात कुठेही उगम पावणारं' अशा अनेक कमेंट्स त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोला मिळत आहेत.
जॅकलिनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जॅकलिन आणि चंदनचे संभाषण इंस्टाग्रामवर सुरू असल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये त्यांची पहिली खरी भेट देखील दाखवली आहे. दोघांचे फोटो शेअर करत जॅकलिनने सांगितले की, 'मी चंदनला आधी मेसेज केला. त्याच्या प्रोफाइलवरून मला कळले की तो ख्रिश्चन धर्माचा अभ्यास करणारा आणि श्रद्धाळू तरुण आहे. चंदनचे संगीत, कला आणि फोटोग्राफी यासारखे छंद माझ्या आवडींशी जुळणारे आहेत. ऑनलाइन १४ महिने डेटिंग केल्यानंतर आणि माझ्या आईची पूर्ण संमती घेतल्यानंतर आम्ही दोघींनी भारतात आयुष्याच्या सर्वात खास प्रवासासाठी येण्याचा निर्णय घेतला.'