

Instagram love affair
उत्तर प्रदेश : इंस्टाग्रामवर झालेली मैत्री एका २१ वर्षीय तरूणाच्या कुटुंबासमोर मोठी समस्या बनली आहे. अमरोहा येथील एक तरुण अनेक दिवसांपासून घरातून बेपत्ता होता, त्याचा शोध घेत त्याची आई आग्रा येथे पोहोचली. ट्रान्स यमुना भागात एका ४० वर्षीय विधवा महिलेच्या घरी मुलगा सापडल्यानंतर ती हादरली.
अमरोहा येथील रहिवासी असलेल्या या तरुणाची इंस्टाग्रामवर आग्रा येथील ट्रान्स यमुना परिसरात एकट्या राहणाऱ्या एका विधवा महिलेशी मैत्री झाली होती. वयात सुमारे १९ वर्षांचे अंतर असूनही दोघांमध्ये जवळीक वाढली. हा तरुण अनेक दिवसांपासून महिलेच्या घरीच राहत होता. घरातून गायब झाल्याने त्याचे कुटुंबीय काळजीत पडले.
तरुणाची आई भाजपशी संबंधित आहे. मुलगा बेपत्ता झाल्यामुळे त्यांनी पोलिसांसोबतच स्थानिक भाजप नेत्यांकडेही मदत मागितली. नेत्यांच्या मदतीने महिलेच्या घराचा पत्ता लागला. त्यानंतर आई थेट आग्रा येथे महिलेच्या घरी पोहचली.
आईला पाहताच तरुण घाबरला आणि त्याने घरातून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान बाहेर मोठा गदारोळ झाला. आरडाओरडा ऐकून शेजारी आणि स्थानिक लोक जमा झाले. लोकांनी त्या महिलेची समजूत घातली की, वयातील मोठ्या अंतरामुळे हे नाते योग्य नाही. एका स्थानिक नेत्यानेही महिलेशी चर्चा केली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. एसीपी छत्ता शेषमणी उपाध्याय यांनी सांगितले की, दोन्ही दोघेही सज्ञान आहेत, त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. पोलीस केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होते. आपापसातील चर्चा आणि तडजोडीनंतर हा वाद शांत झाला. शेवटी तरुण आपल्या आईसोबत अमरोहाला परत गेला. महिलेनेही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि हे प्रकरण निवळले.