पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामची सेवा (Instagram Down) संपूर्ण भारतात मंगळवारी अचानक डाऊन झाली. अनेक यूजर्संना लॉग इन करताना अडचणी आल्या. आउटेज ट्रॅकिंग सेवा देणाऱ्या डाउनडिटेक्टरच्या मते, असंख्य यूजर्संनी सकाळी ११:१५ च्या सुमारास इन्स्टाग्राम ॲपमध्ये लॉग इन करताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली.
डाऊनडिटेक्टवरील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ६४ टक्के यूजर्संनी ॲपमध्ये लॉग इन करताना समस्या आल्याची नोंद केली आहे. २५ टक्के यूजर्संना सर्व्हर कनेक्शनशी संबंधित समस्या जाणवली.
अनेक यूजर्संनी X (पूर्वीचे ट्विटर) वर इन्स्टाग्राम डाऊन झाल्याचे स्क्रीनशॉर्ट्स शेअर केले आहेत. Sorry, something went wrong असा एरर मेसेज असल्याचे यूजर्संनी म्हटले आहे.
दिल्ली, मुंबई, जयपूर, लखनौ, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई आणि देशाच्या इतर भागातील यजर्संना ॲपमध्ये लॉग इन करताना समस्या जाणवल्या. एका यूजर्सने प्रश्न केला की इन्स्टाग्राम खरोखरच सर्व यूजर्संसाठी बंद आहे का? त्यांनी म्हटले आहे की, "इन्स्टाग्राम डाऊन आहे का?. मला वाटले की केवळ मला एकट्यालाच इंटरनेट समस्या आहे?"