नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी समाजमाध्यमांवर चुकीच्या पोस्ट टाकून त्यांच्या पोस्टरवर शाईफेक करणाऱ्या पश्चिम बंगालमधील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे तातडीने अहवाल पाठविण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी पश्चिम बंगाल काँग्रेसच्या प्रभारींना दिले आहेत.
तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडकडे असून अधीररंजन चौधरी यांच्याकडे नाहीत, असे विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मुंबईत केले होते. त्यानंतर पश्चिम बंगालच्या काही काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खर्गे यांच्याविषयी समाजमाध्यमांवर पोस्ट टाकल्या होत्या. पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टरवर शाईफेक केली होती. या प्रकाराची काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. पश्चिम बंगालच्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्षविरोधी कृत्याची आम्ही गंभीर दखल घेतली असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी दिली आहे. या घटनेचा अहवाल तातडीने अखिल भारतीय काँग्रेसला पाठविण्याचे निर्देश पश्चिम बंगाल काँग्रेसच्या प्रभारींना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणावर अधीररंजन चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. शाई फेकण्यात आलेले खर्गे यांचे पोस्टर्स हटवून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :