

Indigo Patna-Delhi flight bird hit emergency landing
पाटणा : पाटणाहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट (6E 5009) ने आज सकाळी पक्षी धडकेनंतर पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केली. या विमानात एकूण 169 प्रवासी होते आणि सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती पाटणा विमानतळाचे संचालक कृष्ण मोहन नेहरा यांनी दिली आहे.
विमानाने सकाळी 8.42 वाजता जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतले होते. विमानाने पाटणा विमानतळावरून उड्डाण घेतल्यावर लगेचच एका पक्ष्याने विमानाच्या इंजिन किंवा इतर भागावर धडक दिली.
ही अत्यंत गंभीर स्थिती असते कारण पक्षी धडकल्यास विमानाचे इंजिन बिघडण्याची शक्यता असते. पायलटने सतर्कपणे निर्णय घेत त्वरित विमान पुन्हा पाटणा विमानतळावर उतरवले.
विमान सुरक्षितपणे परत आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "हे विमान सध्या जमिनीवरच ठेवण्यात आले आहे आणि प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे."
पाटणा विमानतळाजवळील फुलवारीशरीफ परिसरातील कत्तलखान्यांमुळे या परीसरात पक्ष्यांची संख्या जास्त असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. यामुळे पक्षी विमानाच्या मार्गात येण्याची शक्यता वाढते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वीही या भागातील पक्ष्यांची समस्या राज्य सरकारकडे अनेक वेळा मांडली आहे.
पक्षीधडक (Bird Strike) ही विमानचालनासाठी अत्यंत धोकादायक बाब मानली जाते. विशेषतः उड्डाण (takeoff) आणि लँडिंग दरम्यान ही धोक्याची शक्यता अधिक असते कारण विमान जमिनीपासून कमी उंचीवर असते. जर पक्षी इंजिनात शिरला, तर इंजिन फेल होण्याचा धोका संभवतो.
पाटणा विमानतळ (Jay Prakash Narayan International Airport) देशातील सर्वात धोकादायक आणि मर्यादित विमानतळांपैकी एक मानले जाते. याठिकाणी धावपट्टी लहान आहे (Short Runway), आजूबाजूला घरे, झाडे, झोपडपट्ट्या आणि अडथळे आहेत यामुळे लँडिंग आणि टेक-ऑफ करताना अचूकतेची अत्यंत आवश्यकता असते.
बिहार सरकारने केंद्र सरकारकडे विनंती केली आहे की, या समस्येचे मूल्यमापन करण्यासाठी एक बहुविषयक (मल्टिडिसिप्लिनरी) तज्ज्ञांची टीम पाठवावी. यासंदर्भात बिहारचे मुख्य सचिव अमृत लाल मीणा यांनी जून महिन्यात नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिले होते. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून या मागणीला प्रतिसाद मिळालेला नाही.
अशा घटनांनंतर संबंधित विमानाची तपासणी झाल्याशिवाय ते पुन्हा उड्डाण करू शकत नाही. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विमान कंपनीवर असते. प्रत्येक विमानतळावर वाइल्डलाईफ हॅझर्ड मॅनेजमेंट प्लॅन असतो, पण तो प्रभावी अंमलात आणणे महत्त्वाचे ठरते.