

नवी दिल्ली : भारताची हवाई वाहतूक नियामक संस्था, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) संकटात सापडलेल्या इंडिगोच्या सुरक्षा आणि कार्यकारी अनुपालनावर देखरेख करणाऱ्या चार विमान निरीक्षकांना बडतर्फ केले आहे. एअरलाईनच्या तपासणी आणि देखरेखीमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
कडक सुरक्षा नियमांचे नियोजन करण्यात अपयशी ठरल्याने इंडिगोने या महिन्यात हजारो उड्डाणे रद्द केली, ज्यामुळे देशभरात हजारो प्रवासी अडकून पडले. दि. 5 डिसेंबर रोजी रद्द झालेल्या उड्डाणांची संख्या सर्वाधिक होती आणि त्यानंतर ती कमी झाली आहे. एअरलाईनने मंगळवारी सांगितले की, तिचे कामकाज स्थिर झाले आहे आणि सामान्य पातळीवर परत आले आहे.
मूळ कारणांचा शोध घेणार
अलीकडील ऑपरेशनल व्यत्ययांची स्वतंत्रपणे मूळ कारणे शोधण्यासाठी चीफ एव्हिएशन ॲडव्हायझर्स एलएलसी ही कंपनी काम करेल, असे देशांतर्गत विमान कंपनीने म्हटले आहे. कॅप्टन जॉन इलसन यांच्या नेतृत्वाखालील चीफ एव्हिएशन ॲडव्हायझर्स एलएलसी ही कंपनी अलीकडील ऑपरेशनल व्यत्ययांच्या मूळ कारणांचे स्वतंत्रपणे विश्लेषण करेल आणि सुधारणेसाठी आवश्यक सूचना देईल. अलीकडील ऑपरेशनल व्यत्ययांच्या मूळ कारणांचे स्वतंत्रपणे विश्लेषण करणे, तसेच सुधारणेच्या संधी शोधणे हा यामागील उद्देश आहे.