

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने थायलंड-कंबोडिया संघर्षादरम्यान प्रेह विहिअर मंदिराच्या झालेल्या नुकसानीवर चिंता व्यक्त केली आहे. 1,100 वर्षे जुने असलेले हे मंदिर युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असून, दोन शेजारी देशांमधील पुन्हा सुरू झालेल्या सीमावादात त्याचे नुकसान झाले.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या तणावावर चिंता व्यक्त केली. या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, संवर्धन सुविधांचे कोणतेही नुकसान होणे ही दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे.
प्रेह विहिअर मंदिराचे युनेस्को जागतिक वारसा स्थळ हे मानवतेचा सामायिक सांस्कृतिक वारसा आहे. भारत त्याच्या संरक्षणात जवळून सहभागी राहिला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जैस्वाल म्हणाले.
आम्हाला आशा आहे की, या स्थळाचे आणि संबंधित संवर्धन सुविधांचे पूर्णपणे संरक्षण करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जातील. आम्ही पुन्हा एकदा दोन्ही बाजूंना संयम ठेवण्याचे आणि संघर्ष थांबवून पुढील तणाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन करतो. आम्ही त्यांना संवाद आणि शांततेच्या मार्गावर परत येण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले.