

Delhi Mumbai flight fare hike
नवी दिल्ली : गुरुवारपासून विविध ठिकाणाहून इंडिगोची विमान उड्डाणे रद्द होत आहेत. शुक्रवारी तर यामध्ये अधिकच भर पडली. शुक्रवारी दिल्लीहून उडणारी इंडिगोची जवळजवळ सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. याचा फटका अनेक प्रवाशांसह खासदारांनाही बसला.
सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी दुपारनंतर सर्व खासदार आपापल्या मतदारसंघात जाण्यासाठी निघतात. त्याचप्रमाणे शुक्रवारी खासदार निघाले होते. मात्र, इंडिगोच्या उड्डाणांचा फटका खासदारांनाही बसला. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिल्लीहून प्रवास करायचा होता. नियोजित वेळेनुसार ते विमानतळावर पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर आधी त्यांच्या उड्डाणाला उशीर आहे असे सांगितले गेले.
काही तास प्रतीक्षा केली त्यानंतर थेट उड्डाण रद्द झाल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे त्यांना प्रवास करता आला नाही. भंडारा- गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या विमानाने दिल्लीहून नागपूरला जाणार होते. मात्र इंडिगोचे हे उड्डाण देखील रद्द झाले त्यामुळे त्यांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागला. महाराष्ट्रातील खासदारांसह देशाच्या विविध भागातील खासदार तासनतास गुरुवारी आणि शुक्रवारी विमानतळावर वाट बघत राहिले. काहींची उड्डाणे आधीच रद्द झाली होती तर काही खासदारांनी उड्डाण उशिरा आहे म्हणून वाट बघितली मात्र काही तासानंतर त्यांचे उड्डाण रद्द झाल्याचे सांगण्यात आले.
लोकप्रतिनिधींसह सामान्य प्रवाशांनाही याचा मोठा फटका बसला. अनेक प्रवासी महत्त्वाच्या कामानिमित्त दिल्लीहून ठीकठिकाणी प्रवास करत होते. मात्र ऐन वेळेवर उड्डाण रद्द झाल्यामुळे त्यांच्याही वेळेचा आणि पुढील नियोजनाचा मोठा खोळंबा झाला. विशेष म्हणजे इतकी उड्डाणे रद्द होत असताना प्रवाशांना वेळेवर माहिती मिळत नव्हती. प्रवाशांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी, विद्यार्थी, व्यावसायिक, रुग्ण असे विविध घटकांमधील लोक होते. दरम्यान, अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी शुक्रवारी पाहायला मिळाली.
देशभर विमान सेवा देणारी कंपनी म्हणून इंडिगोचा लौकिक आहे. वेळेवर पोहोचवणारी आणि सर्वसामान्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारी विमान सेवा म्हणूनही इंडिगोकडे पाहिले जाते. मात्र इंडिगोची अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांच्या दरामध्ये जवळपास दहापट वाढ झाल्याचे दिसले. दिल्लीहून मुंबई, पुणे, नागपूर या शहरांचे तिकीट दर साधारणपणे ५ - ८ हजार रुपये असते.
मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी स्पाइसजेट या विमान कंपनीचे ६६ हजार रुपयांचे तिकीट काढून दिल्ली - मुंबई विमान प्रवास केला. विशेष म्हणजे दिल्लीहून लंडनचे तिकीट दर देखील एवढे नाही. दिल्लीहून काही देशांमध्ये जाताना आणि येतानाची २ तिकिटे काढले तरी त्याची एकूण किंमत ६६ हजारांपेक्षा कमी असते. देशांतर्गत प्रवास करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागते, ही एक प्रकारची लुबाडणूक आहे आणि परिस्थितीचा फायदा घेतला जात आहे, अशी भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले