

India’s second longest cable bridge inaugurated in Karnataka
पुढारी वृत्तसेवा : देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पूल बुधवारी रहदारीसाठी खुला करण्यात आला. हा पूल कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात शरावती नदीवर बांधण्यात आला आहे. २.४४ किमी लांबीच्या या पुलामुळे लोकांचा तब्बल १०० किमीचा वळशाचा प्रवास वाचला आहे. शरावती नदीच्या दोन तीरांवर असलेल्या होसनगर आणि सिगंदूर या दोन ठिकाणांना हा पूल जोडतो.
हा पूल शिमोगा जिल्ह्यातील होसनगर ते सिगंदर या दोन ठिकाणांना जोडतो. होसनगरच्या लोकांना सिगंदरला पोहोचण्यासाठी १०० किमीचा प्रवास करावा लागत होता. सिगंदरला चौंडेश्वरी मंदिर आहे. ते या लोकांचे दैवत. ते अंतर आता केवळ ६ किमी झाले आहे. याआधी होसनगरच्या लोकांना केवळ दिवसा फेरीबोटीची व्यवस्था होती, पण ती सेवाही मर्यादित होती.
देशातील तारांवर आधारलेला सर्वांत लांब पूल गुजरातमध्ये असून तो द्वारका आणि ओखा यांना जोडतो. त्याला 'सुदर्शन सेतू' असे नाव देण्यात आले आहे. २०२४ मध्ये त्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
पुलाचे नाव सिगंदर चौंडेश्वरी असे ठेवले जाणार आहे. सिगंदरमध्ये चौडेश्वरी देवीचे मंदिर आहे. तेच नाव पुलाला दिले जाईल.
पुलाची लांबी : २.४४ किमी, रुंदी : १६ मीटर
दोन्ही बाजूंना १.५ मीटर रुंदीचा पदपथ
एकूण स्तंभ : १७, उंची ३० ते ५५ मीटर
प्रत्येक स्तंभाचा पाया १७७मीटर अंतरावर
एकूण ६०४ कप्पे (गर्डर), ९६ तारांचा वापर
एकमेकापासून ७४० मीटर अंतरावर केबल-स्टेड
एकूण १६४ मुळे (पाईल्स), एक मनोरा
एकूण स्वर्च : ४७२ कोटी
२०१९ मध्ये करण्यात आली होती घोषणा
शरावती पुलाचा लोकार्पण सोहळा : केंद्रीय मंत्री गडकरी म्हणतात, व्हीसीच्या माध्यमातून तरी हजेरी लावायची
शिमोगा जिल्ह्यातील सागर तालुक्याच्या अंबरगोडलू येथे शरावती नदीवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब तारांच्या पुलाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते सोमवारी झाले. मात्र राज्य सरकारने या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातल्याने केवळ भाजप नेतेच उपस्थित राहिले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना कार्यक्रमात आमंत्रित करताना कोणत्याही शिष्टाचाराचे उल्लंघन केलेले नाही. केंद्र कर्नाटक सरकारच्या सहकार्याचे सतत कौतुक करते. संघराज्य व्यवस्था मजबूत करून सर्व राज्यांशी समन्वय साधण्यासाठी केंद्र वचनबद्ध आहे, असे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना ११ जुलैरोजी उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी अधिकृतपणे आमंत्रित करण्यात आले होते. जर ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसतील, तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होण्याची विनंती करण्यात आली होती, असेही गडकरी म्हणाले, शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याच्या आरोपांमुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह सर्व काँग्रेस मान्यवरांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, खासदार बी. वाय. राघवेंद्र, आमदार अरग ज्ञानेंद्र, एस. एन. चन्नबसप्पा, डी. एस. अरुण, डॉ. धनंजय सरजी यांनी लावली.
राज्यातील बहुप्रतिक्षित पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी काँग्रेस मान्यवरांना आमंत्रित केलेले नाही. त्यांचे मत न विचारता त्यांची नावे त्यांच्या वर्तमानपत्रात छापण्यात आली आहेत. सोमवारीच विजापूर येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहायचे असल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती केली होती.
नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने या पत्राला उत्तर न दिल्याने कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला. मात्र स्थानिक आमदार बेळुरु गोपालकृष्ण यांच्यासह सर्व काँग्रेस नेते कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांना औपचारिकपणे आमंत्रित केले गेले नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. बहुप्रतिक्षीत पुलाचा उद्घाटन समारंभमोठ्या थाटामाटात पार पडला. उद्घाटनापूर्वी स्थानिकांनी पुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. स्थानिक लोकांनी आंब्याच्या माळांनी हा पूल सजवला होता. तुमरी, बायकोडू, सिगंदूर आणि कळसवळ्ळी येथील शेकडो रहिवासी मोठ्या संख्येने छत्र्या, रेनकोट आणि जर्किन घालून उद्घाटनाला हजेरी लावली.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बंगळूरहून शिमोग्यात आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्य सरकारने कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे ऐकल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित न राहताच बंगळूरला परतणे पसंत केले.