

Central Government Railway Expansion 48 Cities
नवी दिल्ली : प्रवाशांच्या संख्येतील सातत्यपूर्ण वाढ लक्षात घेता, पुढील ५ वर्षांत देशाच्या ४८ प्रमुख शहरांमधून धावणाऱ्या गाड्यांची संख्या दुप्पट करण्याची योजना असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी दिली. यासाठी सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने म्हटले. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहराचा समावेश आहे.
रेल्वे गाड्यांची संख्या दुप्पट करण्याची योजना २०३० पर्यंतची असली तरी, पुढील ५ वर्षांत टप्प्याटप्प्याने क्षमता वाढवली जाईल, जेणेकरून याचे फायदे त्वरित मिळू शकतील अशी अपेक्षा आहे, असे मंत्रालयाने म्हटले. या योजनेत नियोजित, प्रस्तावित किंवा आधीच मंजूर केलेल्या कामांचा समावेश असेल, जेणेकरून ठराविक वेळेत गाड्या हाताळण्याची क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, वाढत्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी सरकार विविध शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहे. तसेच विभागीय आणि कार्यात्मक क्षमता वाढवत आहे. या निर्णयामुळे आपले रेल्वे जाळे अद्ययावत होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.
१. सध्याच्या टर्मिनल्समध्ये अतिरिक्त प्लॅटफॉर्म, स्टेबलिंग लाईन्स, पिट लाईन्स आणि पुरेशा शंटिंग सुविधांसह वाढ करणे.
२. शहरी भागात आणि आसपास नवीन टर्मिनल्स तयार करणे.
३. मेगा कोचिंग कॉम्प्लेक्ससह देखभालीच्या सुविधा.
४. रेल्वे गाड्या हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुविधांची कामे, सिग्नलिंगचे आधुनिकीकरण आणि मल्टीट्रॅकिंगद्वारे विभागीय क्षमता वाढवणे.
टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचे नियोजन करताना, टर्मिनल्सच्या आसपासच्या स्थानकांचाही विचार केला जाईल, जेणेकरून क्षमता समान प्रमाणात संतुलित राहील. उदाहरणार्थ, पुणे स्थानकावर प्लॅटफॉर्म आणि स्टेबलिंग लाईन्स वाढवण्यासोबतच, हडपसर, खडकी आणि आळंदी येथील क्षमता वाढवण्यासाठी विचार करण्यात आला आहे, असे मंत्रालयाने म्हटले.