

नवी दिल्ली ः भारतीय रेल्वेने आता रुळांवर होणारे अपघात रोखण्यासाठी सुविधाजनक रेल्वे पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल केवळ 12 तासांत तयार केला जाईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत आयोजित एका उच्चस्तरीय कार्यशाळेत अशा प्रकारच्या पूल बांधणीच्या योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे अतिवेगवान बांधकाम. रेल्वेने अशा डिझाईनवर भर दिला आहे, ज्यामुळे हे पूल केवळ 12 तासांच्या आत वापरासाठी सज्ज होतील. इतकेच नाही, तर या प्रक्रियेमुळे रेल्वे वाहतुकीवर केवळ 12 तासांसाठीच परिणाम होईल. यामुळे रेल्वे वाहतुकीतील व्यत्यय कमीत कमी असेल आणि बांधकाम वेगाने पूर्ण होईल.
अनेक ठिकाणी रुळाच्या एका बाजूला वस्ती असते आणि दुसऱ्या बाजूला शेती, शाळा, स्मशानभूमी किंवा इतर महत्त्वाची ठिकाणे असतात. त्यामुळे दैनंदिन कामासाठी नागरिक मोठ्या संख्येने रूळ ओलांडतात. आता अशी ठिकाणे निश्चित करून तिथे रेल्वे पूल किंवा सब-वे बांधले जातील, जेणेकरून रूळ ओलांडताना होणारे अपघात पूर्णपणे थांबवता येतील.
वाढत्या अपघातांवर उपाय
पूर्वी देशात गाड्यांची संख्या कमी आणि वेगही संथ होता, त्यामुळे रूळ ओलांडणे सोपे होते. मात्र, आता गाड्यांची संख्या आणि वेग दोन्ही वाढल्यामुळे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे रोखण्यासाठी रेल्वेने ही नवीन योजना आखली आहे. मंत्रालयाचे उद्दिष्ट पुढील 5 ते 6 वर्षांत देशातील सर्व संवेदनशील ठिकाणांना या योजनेंतर्गत रेल्वे पुलांनी जोडण्याचे आहे. रेल्वे सर्वप्रथम अशा ठिकाणांची निवड करून तिथे पूल बांधण्याची प्रक्रिया सुरू करेल.
सामान्य नागरिकांच्या गरजांचा विचार
रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हे पूल केवळ पादचाऱ्यांसाठी नसून सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवले जातील. लोक सायकल, मोटारसायकल आणि दैनंदिन वापराच्या इतर वस्तू याद्वारे सहजपणे नेऊ शकतील. पुलाचे डिझाईन असे असेल की, ते वापरताना लोकांना कोणताही त्रास होणार नाही आणि पावसाळ्यात पाणी तुंबण्यासारख्या समस्यांचा त्यावर परिणाम होणार नाही, याचीही खात्री केली जाईल.
कसे असेल पुलाचे स्वरूप?
हे रेल्वे पूल प्रामुख्याने भूमिगत स्वरूपाचे असतील. सब-वे किंवा पुलाची मुख्य रचना आधीच तयार केली जाईल. जिथे पूल बसवायचा आहे, त्या ठिकाणी ती आणली जाईल. जागेवर पोहोचल्यावर रेल्वेचा केवळ 12 तासांचा ब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत रेल्वे रूळ कापून पुलाची रचना बसवली जाईल आणि मार्ग वापरासाठी सज्ज केला जाईल.