

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे (Indian Overseas Congress) अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांचा लॅपटॉप, स्मार्टफोन हॅक करण्यात आला आहे. याची माहिती स्वतः सॅम पित्रोदा यांनी दिली आहे. त्यांनी आज शनिवारी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून त्यांचा लॅपटॉप, स्मार्टफोन आणि सर्व्हर वारंवार हॅक झाला आहे. हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीमध्ये हजारो डॉलर्सची मागणी करत त्यांना धमक्या दिल्या आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेला पाठवलेल्या ईमेलमध्ये पित्रोदा यांनी म्हटले आहे, "मी एक महत्त्वाची बाब तुमच्या निर्दशनास आणून देऊ इच्छितो की गेल्या काही आठवड्यांपासून माझा लॅपटॉप, स्मार्टफोन आणि सर्व्हर वारंवार हॅक झाले आहेत. क्रिप्टोकरन्सीमध्ये हजारो डॉलर्सची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास बदनामी केली जाईल, अशी धमकी हॅकर्सनी दिली आहे."
"हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सी चलनात हजारो डॉलर्स देण्याची मागणी करत धमक्या दिल्या आहेत. त्यांनी इशारा दिला आहे की जर पैसे न भरल्यास ते माझ्या नेटवर्कमधील लोकांशी संपर्क साधून माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी मोहीम सुरू करतील," असा इशारा हॅकर्सनी दिला आहे.
पित्रोदा यांनी कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच डिव्हाइसेसना हानी पोहोचवू शकणाऱ्या मालवेअरबद्दल त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. "तुम्हाला कोणत्याही अज्ञात ईमेल/मोबाईल क्रमांकावरून माझ्याबद्दल आलेले कोणतेही ईमेल किंवा मेसेजीस प्राप्त झाल्यास, ते ओपन करु नका, माझ्या लिंकवर क्लिक करू नका आणि कोणतेही attachments डाउनलोड करू नका (ते डिलिट करा). कारण तो मालवेअर असू शकतो. ते तुमच्या स्वतःच्या डिव्हासेसची तडजोड करू शकते," असे म्हणत पित्रोदा यांनी सावध केले आहे.