

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये एक निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षण सुविधेशी निगडित आहे, तर दुसरा पायाभूत सुविधांशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सरकारने देशभरात ८५ नवीन केंद्रीय विद्यालये (Central Schools Approval) उघडण्याचा निर्णय घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील ३ नवीन केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे. याशिवाय २८ नवीन नवोदय विद्यालये (Navodaya Vidyalaya) सुरू करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशातील १९ जिल्ह्यांमध्ये ८५ नवीन केंद्रीय विद्यालये (Central Schools Approval) उघडण्यात येणार आहेत. यापैकी सर्वात जास्त जम्मू आणि काश्मीरमधील १३, मध्य प्रदेशातील ११ केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे. याशिवाय राजस्थानमध्ये ९, ओडिशामध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी ८, उत्तर प्रदेशमध्ये ५, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये प्रत्येकी ४, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रत्येकी ३, झारखंड आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी २, दिल्ली, केरळ, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी १ केंद्रीय विद्यालय सुरु केले जाणार आहे. यासह कर्नाटकातील एका केंद्रीय विद्यालयाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन केंद्रीय आणि नवोदय विद्यालयांसाठी ८ हजार २३२ कोटी रुपये खर्च करण्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे.
केंद्रीय विद्यालयांतून ८२ हजार ५६० विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. या विद्यालयांमध्ये ५ हजार ३८८ नियमित पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. त्यासाठी ५ हजार ८७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. २८ नवीन नवोदय विद्यालये सुरू झाल्याने ग्रामीण भागातून निवड झालेल्या १५ हजार ६८० विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या नवोदय विद्यालयांमध्ये १ हजार ३१६ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी २ हजार ३६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
केंद्रीय शिक्षण सहसचिव प्राची पांडे यांनी ‘दै. पुढारी’ला सांगितले की, महाराष्ट्रात तीन नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. अकोला, रत्नागिरी आणि पुणे येथे ही विद्यालये सुरू होणार आहे. ठाण्यात नवीन नवोदय विद्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्लीतील मेट्रो फेज ४ च्या सहाव्या कॉरिडॉरला मंजुरी दिली. वैष्णव यांनी सांगितले की, दिल्ली आणि हरियाणा शहरांना जोडणाऱ्या रिठाला-नरेला-कुंडली कॉरिडॉरला आज मंजुरी देण्यात आली. त्याअंतर्गत २६.४६ किलोमीटरची मेट्रोलाईन तयार करण्यात येणार आहे. यामध्ये २१ मेट्रो स्टेशन असतील. २०१४ पूर्वी केवळ ५ शहरांमध्ये मेट्रो होती. आता २३ शहरांमध्ये मेट्रो आहे, असे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या नवीन कॉरीडॉरमुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा दावा वैष्णव यांनी केला. केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात विमानतळ, रस्ते, बंदरे, महामार्ग, रेल्वे यासारख्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर आतापर्यंत ९.५ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.