

केरळच्या अझिकल किनाऱ्यापासून काही अंतर दूर समुद्रात MV Wan Hai 503 या जहाजावर अचानक आग लागली. यावेळी खवळलेला समुद्र आणि प्रतिकूल हवामानतही भारतीय नौदलाचे हात मदतीसाठी पुढे सरसावले. भारतीय नौदलाने आणखी मोठी बचाव मोहिम यशस्वी केली. भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) मदतीने सिंगापूरच्या ध्वजाखालील कंटेनर जहाजाला यशस्वीरित्या ओढून नेण्यासाठी मदत केली. ही आग नियंत्रणात आणण्याच्या आणि सागरी पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, अशी माहिती आज (दि. १४) भारतीय नौदलाने एक्स पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
सोमवार ९ जून रोजी MV Wan Hai 503 कंटनेर जहाजात स्फोटानंतर आग लागली. कोचीनमधील आयएनएस गरुड या नौदल तळावरून सीकिंग हेलिकॉप्टरद्वारे रवाना करण्यात आले. भारतीय नौदलाने एक्सवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तीन जणांच्या बचाव पथकाच्या सदस्यांना भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून अपघातग्रस्त कंटेनर जहाजाच्या मागील बाजूस नेण्यात येत असल्याचे दिसत आहे. जहाजाच्या बऱ्याच भागावरील कार्गो होल्ड आणि कंटेनरमध्ये आग लागली असताना बचाव पथकाला ऑफशोर वॉरियर या बचाव पथकाला एक टो जोडण्यात यश आले. टो जोडल्यानंतर नौदलाच्या हेलिकॉप्टरने बचाव पथकाला यशस्वीरित्या जहाजातून बाहेर काढण्यात आले. सध्या जहाजाच्या टोइंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या भारतीय नौदलाचे आयएनएस शारदा आणि ओएसव्ही एमव्ही ट्रायटन लिबर्टी हे जहाजे भारतीय तटरक्षक दल आणि इतर सागरी संस्थांच्या समन्वयाने बचाव कार्यात सक्रीय सहभागी आहेत. भारतीय नौदलाच्या या जलद उतरवणूक आणि पुनर्प्रत्यावर्तन कारवाईमुळे बचावकार्याला मोठे बळ मिळाले आहे, असेही भारतीन नौदलाने आपल्या एक्स पोस्टमध्ये नमूद केले आहे.
भारतीय नौदलाने तत्काळ बचाव मोहिम राबवत संकटग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले. या धडक मोहिमेनंतर चीनने भारताचे आभार मानले आहेत भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, "९ जून रोजी, केरळमधील अझिकलपासून ४४ नॉटिकल मैल अंतरावर MV Wan Hai 503 जहाजावर आग लागली. जहाजावर असलेल्या एकूण २२ क्रू मेंबर्सपैकी १४ चिनी तर ६ तैवानचे आहेत. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जलद आणि व्यावसायिक बचावकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.पुढील शोध मोहीम यशस्वी व्हावी आणि जखमी कर्मचाऱ्यांना लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे."
याआधीही भारतीय नौदलाने अनेक आंतरराष्ट्रीय सागरी संकटांमध्ये आपली भूमिका समर्थपणे बजावली आहे. येमेनमधील ऑपरेशन राहत किंवा आफ्रिकन किनाऱ्याजवळील चाचेगिरीच्या बंदोबस्त करण्यात भारतीय नौदल सक्रिय राहिले आहे.