

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय नौदलाने आण्विक पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’वरून ३,५०० किमी K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ बुधवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती संरक्षण सुत्रांनी दिली आहे. ‘आयएनएस अरिघात’ ही देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ऑगस्टमध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या 'INS Arighaat'वरून घेण्यात आलेली K-4 क्षेपणास्त्राची ही पहिली चाचणी आहे. K-4 ची गेल्या अनेक वर्षांत आतापर्यंत केवळ सबमर्सिबल पोंटून्समधून चाचणी घेण्यात आली होती.
बुधवारी सकाळी विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात ही चाचणी घेण्यात आली. K-4 क्षेपणास्त्र हे घन-इंधन आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता ३,५०० किमीपर्यंत आहे. ते ६ हजार टन वजनाच्या ‘आयएनएस अरिघात’ पाणबुडीतून प्रक्षेपित करण्यात आले.
या चाचणीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, K-4 क्षेपणास्त्र सरावाचा एक भाग म्हणून प्रक्षेपित केले गेले. ‘आयएनएस अरिघात’वरून या क्षेपणास्त्राची पहिल्यांदाच चाचणी घेण्यात आली. यापूर्वी के-4 क्षेपणास्त्राची चाचणी केवळ सबमर्सिबल पोंटून्सवरूनच घेण्यात आली होती. आता संपूर्णपणे कार्यरत पाणबुडीतून या क्षेपणास्त्राची चाचणी घेणे हे भारतीय नौदल क्षमतेसाठी मैलाचा दगड ठरला आहे.
या क्षेपणास्त्राने त्याचे इच्छित लक्ष्य भेदले आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी चाचणी परिणामांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले जात आहे. २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान नियोजित असलेल्या बंगालच्या उपसागरात मध्यवर्ती पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीसाठी सार्वजनिक इशारा जारी केल्यानंतर ही क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली. ही क्षेपणास्त्र चाचणी भारताच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग होती. यामुळे नौदलाची ताकद वाढली आहे.
देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्याने भारताचे नौदल सामर्थ्य वाढले आहे. आयएनएस अरिघात पाणबुडीचे वजन सहा हजार टन असून, तिची लांबी ११२ मीटर आहे. ‘आयएनएस’च्या आतमध्ये अणुभट्टी असून, त्यामुळे पाणबुडीला वेग मिळतो. ही पाणबुडी सागरी पृष्ठभागावर कमाल १२-१५ नॉटस् (२२ ते २८ किलोमीटर प्रतितास) आणि पाण्याखाली २४ नॉटस् (४४ किलोमीटर प्रतितास) वेग देऊ शकते. ‘अरिघात’मध्ये दुहेरी हुल, बॅलास्ट टँक, दोन सहायक इंजिन आणि आपत्कालीन स्थितीत शक्ती आणि गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थ्रस्टर बसविले आहेत. सागरी किनार्यावर अतिशय शांतपणे गस्त घालणार्या आण्विक पाणबुडीमुळे भारतावर कोणताही देश अण्वस्त्र हल्ला करण्याचे धाडस दाखविणार नाही.
अरिघातच्या समावेशाने सागरी विश्वात भारताचा दबदबा वाढला आहे. ८ वर्षांपूर्वी २०१६ मध्ये भारतीय नौदलात आण्विक विजेवर चालणारी पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतला सामील केले होते. आयएनएस अरिघात अरिहंतपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. यावरून आता साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदणाऱ्या चार आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (के-4) चाचणी घेण्यात आली आहे. युद्धाच्या स्थितीत ही पाणबुडी शत्रूच्या किनारपट्टीवर गुप्तपणे जाऊ शकते आणि मोक्याच्या ठिकाणांवर हल्ला करू शकते.