

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेसेजिंग ॲप टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांच्या अटकेनंतर भारत सरकारही चौकशी सुरू करणार आहे. सरकारला हे जाणून घ्यायचे आहे की हे ॲप गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरले जात आहे की नाही, ज्यामध्ये खंडणी आणि जुगार इत्यादींचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली आहे. हे ॲप तपासात दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
अलीकडेच, फ्रान्स पोलिसांनी टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना अटक केली. फ्रेंच सरकारने रशियन वंशाच्या दुरोववर अनेक गंभीर आरोप केले आहेत, जे सिद्ध झाल्यास 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. भारत सरकारही टेलिग्रामच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये आले आहे. केंद्र सरकार दुरोवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कारवाईदरम्यान सरकारला योग्य वाटल्यास टेलिग्राम ॲपवर भारतातही बंदी घालण्यात येईल.
आयटी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालय विविध बेकायदेशीर कामांबाबत टेलिग्रामवर लक्ष ठेवून आहे. मनी लाँड्रिंग, ड्रग तस्करी आणि पेडोफिलिक सामग्रीचे सामायिकरण अशा बेकायदेशीर कामांचा तपासाचा समावेश आहे. माहिती आणि तंत्रज्ञान (IT) मंत्रालय लवकरच टेलीग्रामद्वारे होत असलेल्या विविध बेकायदेशीर क्रियाकलापांवर आपल्या शिफारशी गृह मंत्रालयाला पाठवणार आहे.
टेलिग्राम अलीकडेच UGC-NEET वादाच्या संदर्भात चर्चेत होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका या ॲपद्वारे लीक झाली होती आणि ती टेलिग्रामवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, या प्लॅटफॉर्मवर पेपरची 5,000 ते 10,000 रुपयांमध्ये विक्री झाली.
यापूर्वी 23 मे रोजी, गृह मंत्रालयाच्या शिफारशींच्या आधारे, केंद्र सरकारने ब्रिअर, एलिमेंट, जर्मनीचे क्रीपवाइजर, यूकेचे एनिग्मा, स्वित्झर्लंडचे सेफस्विस आणि AWSच्या मालकीचे WickrMe सारख्या अनेक एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप ब्लॉक करण्यात आले आहेत. आयटी मंत्रालय एंड-टू-एंड एनक्रिप्टेड ईमेल प्लॅटफॉर्म प्रोटॉन मेलला ब्लॉक करण्याचा विचार करत आहे. या मेलद्वारे शाळा, मॉल आणि अगदी विमानतळांना खोट्या बॉम्बच्या धमक्या पाठवण्यासाठी गैरवापर केला जातो. पण भारत सरकारला बंदीचा निर्णय पुढे ढलकण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.