पुढारी ऑनलाईन डेस्क
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार आणि भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे (Indian cricketer Shivam Dube) याची पत्नी अंजुम खान (Anjum Khan) हिच्या ताज्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तिने तिच्या वैयक्तिक इंस्टाग्राम स्टोरीमध्ये भाजप नेत्या नाझिया इलाही खान (BJP leader Nazia Elahi Khan) यांना अटक करण्याचे आवाहन करणारी स्टोरी पोस्ट केली. तसेच मुस्लिमांना तिच्यावर कारवाई करण्याचे आवाहन केले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की नाझिया इलाही खान यांनी नेमके काय म्हटले आहे ज्यामुळे अंजूम खान भडकली आहे. इंस्टाग्रामवरील स्टोरीमध्ये, अंजुम खानने म्हटले आहे की जर तुम्हाला पैगंबर यांचा अनादर झाल्याबद्दल राग येत नसेल तर तुमचा अंतरात्मा संपला आहे अथवा तो अजूनही जिवंत असेल तर #ArrestNaziaElahiKhan हा हॅशटॅग वापरून ही पोस्ट रिपोस्ट करा. "प्रत्येकाला विनंती आहे, नाझिया इलाही खान यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली आहे. मुस्लिमांविरुद्ध बोलल्यानंतर ती आता आमच्या आका (स्वामी) विरुद्ध अर्थशून्य बोलत आहे."
दरम्यान, ही पोस्ट केल्यानंतर काही तासांतच ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर अंजुमने तिची पोस्ट डिलीट केली. सोमवारी संध्याकाळी नाझिया यांनी अंजुम खानला प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, नाझिया इलाही खान यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले, ''तुम्ही शिवम दुबे अजून हिंदू आहात आणि इस्लामनुसार तुमचा विवाह मान्य नाही, मी हे घटनात्मक न्यायालय आणि शरिया न्यायालय अशी दोन्ही ठिकाणी सिद्ध करेन. पण तुमच्या पत्नीने माझ्या विरोधात भडकाऊ, द्वेषपूर्ण, भयानक असे लिहिले आहे. माझ्याविरोधात पोस्ट का केली? हे तिला आता सांगावे लागेल. मी नोटीस पाठवली आहे, तुमची हिंमत तेव्हाच कळेल जेव्हा तुमची पत्नी कोर्टात येऊन उत्तर देईल!''
नाझिया इलाही खान ह्या भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या सदस्य आहे; ज्यांनी तिहेरी तलाक पीडित इशरत जहांची बाजू मांडली होती. त्यांनी मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विरुद्ध भेदभाव करणाऱ्या धार्मिक प्रथांविरुद्ध आवाज उठवत असल्याचा दावा केला होता. यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. नाझिया इलाही खान यांनी याआधी उघडपणे राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तसेच विविध मीडिया चॅनेलवर काँग्रेसच्या दिग्गजांच्या विरोधात मुलाखती दिल्या आहेत.