

Shubhanshu Shukla school student interaction Live from ISS Indian schools space program Space education India NASA ISS live event
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ इतिहासात एक नवे पर्व सुरू झाले आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले आहेत.
अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरवरून 25 जून रोजी त्यांनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून यशस्वी उड्डाण घेतले, आणि 28 तासांनी ISS वर यशस्वीपणे डॉकिंग केले.
ही मोहीम भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली असून, ही कामगिरी ISRO च्या 550 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने शक्य झाली आहे. दरम्यान, आता शुभांशू हे भारतातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी थेट अंतराळ स्थानकातून लाईव्ह संवाद साधणार आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) पृथ्वीवरील ट्रॅकिंग केंद्रांवरून जात असताना आणि संवाद लिंक स्थापन करत असताना, थेट संवाद सत्रांचे आयोजन करण्याची योजना आहे.
या कार्यक्रमातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा भारतातील शालेय विद्यार्थ्यांशी थेट संवाद होणार आहे. हा संवाद तरुण पिढीला विज्ञान आणि अंतराळ संशोधनासाठी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात पोहोचताच देशवासीयांना उद्देशून म्हटले की, "नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो, 41 वर्षांनंतर पुन्हा अंतराळात परतलो आहोत… खांद्यावरच्या तिरंग्याची जाणीव मला तुमच्याशी जोडून ठेवते."
1984 मध्ये राकेश शर्मा यांनी “सारे जहाँ से अच्छा” या शब्दांत भारताचे अंतराळातून वर्णन केले होते. त्यांनी सर्वप्रथम भारताचे अंतराळात पहिले प्रतिनिधित्व केले होते. 41 वर्षांनंतर शुक्ला हे ISS वर भारताचा झेंडा अभिमानाने फडकावत आहेत.
शुभांशू शुक्ला हे व्यावसायिक वैज्ञानिक नसले तरी, अंतराळात प्रयोग करण्याचे त्यांना खास प्रशिक्षण दिले गेले आहे. ते ISRO च्या 7 विशेष प्रयोगांवर काम करत आहेत:
खाद्ययोग्य सूक्ष्मशैवाल (microalgae) – दीर्घकालीन अंतराळ प्रवासासाठी पोषक अन्न स्रोत करण्याबाबतचा हा प्रयोग आहे.
photosynthetic cyanobacteria – भविष्यातील जीवनसहायक प्रणालींसाठी संशोधन या प्रयोगातून केले जाणार आहे.
मांसपेशींच्या कार्यक्षमतेवर परिणाम – शून्य गुरुत्वाकर्षणाचा परिणाम या प्रयोगातून अभ्यासला जाईल.
अंतराळात संगणक स्क्रीनचा मेंदूवर होणारा प्रभाव – या पयोगाचा उपयोग वापरकर्त्यासाठी अनुकूल संगणक डिझाईनसाठी होईल.
टार्डिग्रेड्सवरील अभ्यास – अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहणाऱ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास यातून केला जाणार आहे.
अवकाशात पिकांची लागवड – बीजांकुरण व अनेक पिढ्यांवर त्याचा प्रभाव याचे निरिक्षण या प्रयोगातून केले जाईल.
अनुभव संकलन – थेट डेटा संकलन करून पृथ्वीवरील संशोधकांना पुरविणे.
मिशनला तीन आठवड्यांचा उशीर झाल्याने काही प्रयोगांच्या वैधतेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः स्टेम सेलचे पूर्वसंवर्धित नमुने काही दिवसांत निष्प्रभ होण्याची शक्यता आहे. मात्र, सूक्ष्मजैविक नमुने योग्य तापमानात ठेवले असल्यास ते काही काळ टिकू शकतात, असं वैज्ञानिकांचे म्हणणं आहे.
11 सदस्यांचा गट
ISS वर आधीपासूनच 7 अंतराळवीर कार्यरत होते. शुक्ला यांच्यासह आलेल्या Axiom Space च्या 4 सदस्यांमुळे आता एकूण 11 जण ISS वर आहेत. पुढील 14 दिवसांत ही टीम 31 देशांतील 60 पेक्षा अधिक प्रयोगांवर काम करणार आहे.
शुभांशू शुक्ला यांची ही मोहीम केवळ एक वैज्ञानिक प्रवास नसून, ती भारताच्या नव्या अंतराळ युगाची सुरुवात आहे.
लखनऊसारख्या शहरातून उगम पावलेला एक मुलगा आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. हे चित्र देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला स्वप्ने बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देते.
ही मोहीम ISRO च्या ‘गगनयान’ प्रकल्पाची पूर्वतयारी मानली जाते. पूर्णपणे देशी अंतराळवीर गगनयान मोहिमेद्वारे भारतीयांना अंतराळात पाठवण्याचा उद्देश आहे आणि शुक्ला यांची ही मोहीम त्या दिशेने उचललेले पहिले मोठे पाऊल आहे.